‘इलनेस’कडून ‘वेलनेस’कडे नेणारा दीपस्तंभ : डॉ. आनंद नाडकर्णी

Total Views |

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, समाजसुधारक, लेखक, नाटककार, ‘आयपीएच’ आणि ‘मुक्तांगण’चे विश्वस्त आणि ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ. आनंद नाडकर्णी यांची शुक्रवार, दि. 15 मे रोजी प्राणज्योत मालवली. हजारोंच्या चेहर्‍यांवर आनंदाची लकेर उमटविणार्‍या डॉ. नाडकर्णी यांच्या स्मतृींना उजाळा देणारा हा लेख...

माझ्या निवडीनंतर जेव्हा मी ‘केईएम’ रुग्णालयात रुजू झाले, तेव्हा नेमकी डॉक्टर आनंद नाडकर्णींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरच माझी नियुक्ती झाली होती. तो काळ माझ्यासाठी एका विचित्र संकोचाचा होता. कारण, सायन किंवा नायर रुग्णालयाच्या तुलनेत ‘केईएम’ची संस्कृती एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी होती, जिथे माणूस चटकन रुळू शकत नाही. सुरुवातीचे 15-20 दिवस तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे मला खूप कठीण जात होते.

अशाच एका दुपारी, मी त्या विभागात एका खुर्चीवर अवघडून बसलेले असताना आनंद अचानक तिथे काही कामानिमित्त आला. मला पाहून, आपल्या त्या चिरपरिचित हसर्‍या चेहर्‍याने तो सहज म्हणाला, “कसं वाटतंय? काळजी करू नकोस, हळूहळू सवय होईल तुला याची!” त्याला कसे काय बुवा समजले कुणास ठाऊक! पण, त्या कठीण काळात त्याच्या या दोन शब्दांनी मला मोठा दिलासा दिला आणि पुढे मी त्याच ‘केईएम’मध्ये स्थायिक झाले, अगदी विभागप्रमुख आणि डीन होईपर्यंत!

गिरणगावचे दुःख आणि व्यसनमुक्तीची पहिली लाट

सुमारे 38-39 वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईच्या ‘केईएम’ रुग्णालयातील मनोविकारशास्त्राची 15 नंबरची ‘ओपीडी’ आणि वॉर्ड 19. तो काळ होता, मुंबईतील गिरण्या बंद पडल्यानंतरचा! ‘केईएम’ रुग्णालय गिरणगावच्या वेशीवरच असल्याने या औद्योगिक संकटाचे थेट चटके ‘ओपीडी’त जाणवत होते. गिरण्या कुलूपबंद झाल्याने कामगारांची आर्थिककोंडी झाली, नोकर्‍या गेल्या आणि सोबतीला नैराश्याचा तीव्र अंधार आला. या विवंचनेतून गिरणगावातील घरातले
कर्ते पुरुष दारूच्या भयंकर आहारी जाऊ लागले आणि हसतीखेळती कुटुंबे देशोधडीला लागली.

त्याच काळात ‘केईएम’मध्ये मनोविकारशास्त्रात ‘एमडी’ करत असलेला आनंद, त्यांचे विभागप्रमुख डॉ. एल. पी. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या कामगारांच्या दारूच्या व्यसनाचा आणि त्यांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करत होता. योगायोगाने याच काळात व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. अनिल अवचट हेही आनंदसोबत या कार्यात खांद्याला खांदा लावून उभे होते.

नेमक्या याच तणावपूर्ण कालखंडात मुंबईत ‘ब्राऊन शुगर’सारख्या अमली पदार्थांचे एक नवे, जीवघेणे संकट वेगाने हातपाय पसरत होते. अशा भयंकर कोंडीत सापडलेला, चेहर्‍यावरची रया गेलेला एखादा रुग्ण जेव्हा समोर यायचा आणि खालावलेल्या आवाजात म्हणायचा, “जबाबदार्‍या खूप आहेत हो, कमावणारा मी एकटा...” तेव्हा त्याचा तो पराभूत देह पाहिला की, आनंदचे मन आतून हेलावून जायचे.

बाहेर रुग्णांची अथांग गर्दी आणि आत रुग्णांना तपासणारा हा तरुण निवासी डॉक्टर केवळ औषधोपचार करून किंवा कोरडी ‘केस’ म्हणून रुग्णाला सोडणारा नव्हता. माणसाचे हे जगणे आणि त्यामागील सामाजिक दुःख समजून घेण्यासाठी त्याने ‘पेशंट’ हा शब्द बाजूला सारला. त्याने अशा कुटुंबांच्या ‘कहाण्या’ गोळा केल्या आणि त्यांच्यावर होणार्‍या मनोसामाजिक परिणामांचा अभ्यास केला. या गंभीर समस्येवर त्याने केवळ ‘ओपीडी’पुरते मर्यादित न राहता, वर्तमानपत्रांतून सातत्याने सडेतोड लेखन केले आणि दूरदर्शनच्या (टीव्ही) माध्यमातून विशेष कार्यक्रम करून संपूर्ण समाजात जागृतीची मोठी लाट आणली. मनोविकाराच्या लक्षणांच्या आणि व्यसनाच्या पलीकडे जाऊन माणसाचे मन वाचणारा हा तरुण डॉक्टर म्हणजेच- डॉ. आनंद नाडकर्णी!

वर्गमित्रांचा ‘आनंद’ : विज्ञानाची बुद्धिमत्ता आणि कलेचे हृदय

1976चे ‘केईएम’मधील ‘एमबीबीएस’चे सृजनशील दिवस मजेत जगत, जळगावहून आलेला हा अत्यंत हुशार मुलगा पुढे ‘एमडी’ परीक्षेत मुंबई विद्यापीठात पहिला आला. तो केवळ अभ्यासातच नाही, तर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘हवा कॉलेजची’ मधून लिहिणारा उमदा लेखक म्हणूनही परिचयाचा झाला.

वर्गमित्रांच्या आठवणींनुसार, आनंद कमालीचा तल्लख, नम्र आणि संसर्गजन्य खळखळून हसणारा होता. त्याच्या वैचारिक, समृद्ध आणि हास्य-विनोदाने भरलेल्या गप्पा आजूबाजूच्या वातावरणात ऊर्जा भरायच्या. एक डॉक्टर, लेखक आणि वक्ता असण्यापलीकडे तो एक संवेदनशील ‘फूड लव्हर’ (विशेषतः फिशप्रेमी) आणि पाय जमिनीवर असलेला ‘उत्कृष्ट माणूस’ होता.

रुग्णांचा आणि सहकार्‍यांचा ‘शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’

ज्या काळात मानसिक आजार म्हणजे ‘वेडेपण’ हा शिक्का मारला जायचा आणि ‘व्यसन’ हा गुन्हेगारीचा भाग मानला जायचा, त्या काळात ’शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट’ डॉ. नाडकर्णी यांनी याकडे ‘सहानुभूती आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून’ पाहिले. 1988 मध्ये जेव्हा अमली पदार्थांच्या विळख्याबद्दल समाज अनभिज्ञ होता, तेव्हा त्यांनी ‘गर्दच्या विळख्यात’ लिहून धोक्याची घंटा वाजवली.

‘शुभार्थी’ आणि ‘शुभंकार’ : त्यांनी रुग्णांना ‘पेशंट’ न म्हणता, ‘शुभार्थी’ (बरे होऊ इच्छिणारे) आणि त्यांच्या नातेवाईकांना ‘शुभंकार’ (सोबत देणारे) ही नावे दिली. या दोन शब्दांनीच मानसिक आजारांशी जोडलेला सामाजिक कलंक (Stigma) निम्म्याहून अधिक कमी केला.

‘मुक्तांगण’ आणि ‘आयपीएच’ : एखाद्या संस्थेची उभारणी व्यक्तिकेंद्री न ठेवता, ती एका ध्येयाभोवती कशी चालवावी, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. ठाण्यातील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ’च्या माध्यमातून त्यांनी मानसोपचाराला क्लिनिकच्या चार भिंतींच्या बाहेर काढून लोकचळवळ बनवले.

‘आयपीएच’ : केवळ संस्था नव्हे, एक मानवी चळवळ!

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाण्यात लावलेले ‘आयपीएच’ या संस्थेचे रोपटे आज एक अथांग वटवृक्ष झाले आहे. मानसोपचाराला रुग्णालयाच्या पांढर्‍या भिंतींमधून बाहेर काढून त्यांनी ‘इलनेस ते वेलनेस’ (Illness to Wellness) असा एक नवा मार्ग दाखवला. ‘आयपीएच’च्या माध्यमातून त्यांनी केवळ आजारांवर उपचार केले नाहीत, तर समाजाला ‘मानसिकदृष्ट्या साक्षर’ केले.

लहान मुलांच्या मनाचा कानोसा घेणारे बालमानसशास्त्र केंद्र असो, संकटात सापडलेल्यांना वाचवणारी हेल्पलाईन असो की, तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारा ‘वेध’सारखा महाउत्सव असो; सरांनी प्रत्येक उपक्रमात व्यावसायिक उत्कृष्टतेसोबतच मानवी मूल्यांचा सुवर्णमध्य साधला. हीच त्यांच्या दूरदृष्टीची आणि व्यावसायिक कौशल्याची सर्वात मोठी पावती आहे.

वेळेचे अचूक व्यवस्थापन,अफाट वाचन आणि कल्पकता

आनंदच्या अफाट कामाच्या वेगामागे त्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते, ते म्हणजे त्याचे कमालीचे ‘टाईम मॅनेजमेंट’ (वेळेचे व्यवस्थापन) आणि अत्यंत व्यावहारिक (Practical) दृष्टिकोन. सततच्या प्रवासाचा कंटाळा न करता, तो आपला प्रवासाचा वेळ अत्यंत कल्पकतेने लिहायला किंवा ‘स्केचेस’ काढायला वापरायचा. त्याचे वाचन अफाट होते. कथा-कादंबर्‍यांपासून ते थेट ‘उपनिषदे’, ‘वेद’ आणि पाश्चात्त्य मानसशास्त्रातील नवनवीन संशोधनांपर्यंत सर्वकाही तो लीलया फस्त करायचा.

या प्रवासात आनंद स्वतःला नशीबवान समजायचा. कारण, त्याला अशा व्यक्तींची साथ लाभली; ज्यांनी त्याच्यातील गुणांना ओळखले, जोपासले आणि खर्‍या अर्थाने ‘नर्चर’ केले. डॉ. शुभा थत्ते आणि अनुराधा सोवनी यांच्यासारख्या खंबीर, विचारी आणि समविचारी सहकार्‍यांच्या भक्कम साथीमुळेच ‘आयपीएच’चा हा डोलारा इतका यशस्वीपणे उभा राहू शकला.

अष्टपैलू सृजनशीलता : एकाच देहात अनेक कलावंतांचा वास डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ डॉक्टर नव्हते, तर ते निसर्गाने बहाल केलेले एक अद्भुत रसायन होते. ‘मानसशास्त्र’ जर त्यांची माता असेल, तर ‘कला’ हा त्यांचा श्वास होता.

लेखक आणि तत्त्वज्ञ :
त्यांनी मराठीत तब्बल 27हून अधिक पुस्तके लिहिली. ‘एका सायकॅट्रिस्टची डायरी’, ‘स्वभाव-विभाव’, ‘मुक्तिपत्रे’ आणि नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणारे ‘हेही दिवस जातील’ हे पुस्तक अनेकांसाठी जीवन जगण्याचा ‘पाथर्फांडर’ ठरले.

नाट्य आणि संगीत :
स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्या शेवटच्या भेटीवर त्यांनी लिहिलेले नाटक त्यांच्यातील संवेदनशील लेखकाची साक्ष देते. ते उत्तम कवी होते, त्यांचे गायन सुरेल होते आणि तबल्यावर तर त्यांचे हात तितक्याच ताकदीने बोलायचे.

चित्रे आणि रेखाटने :
देशविदेशात फिरताना ते केवळ निसर्ग पाहत नसत, तर तिथली सुंदर ‘लाईन स्केचेस’ (रेखाचित्रे) डायरीत उतरवत. जेव्हा ते मित्रांना आपली चित्रे दाखवायचे, तेव्हा त्यांचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा उत्साहाने आणि कुतूहलाने डवरलेला असायचा.

तर्क आणि भावनेचा सुवर्णमध्य

भारतात ‘REBT’ (Rational Emotive Behavior Therapy) तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अफाट काम त्याने केले. दरवर्षी ठाण्यात भरणारे त्याचे ‘REBT’चे वर्ग म्हणजे एक ज्ञानोत्सव असायचा; जिथे वयाची अट विसरून अनेक दिग्गज एखाद्या लहान मुलासारख्या उत्सुकतेने त्याचे विचार ऐकत बसत.

विचारांमधली स्पष्टता, अथांग संयम आणि हुकूमशाही न गाजवता, केवळ एक मित्र म्हणून निष्पक्ष सल्ला देणे, ही त्याची खासियत होती. नवोदित डॉक्टरांना सातत्याने प्रोत्साहन देणार्‍या आनंदने ‘डिजिटल’युगाचे महत्त्व ओळखून ‘युट्यूब’च्या माध्यमातून लाखांमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यमही लीलया आत्मसात केले.

जेव्हा संपूर्ण वैद्यकीय जगतात ‘बायोलॉजिकल सायकियाट्री’ची एक प्रचंड मोठी लाट आली होती, मेंदूतील रसायनांवर आणि औषधांवरच सर्व भर दिला जात होता; तेव्हा आनंदने या लाटेच्या प्रवाहात वाहून न जाता मानवी मनाच्या शक्तीवर आपला विश्वास कायम ठेवला. 25 वर्षांपूर्वी एका अनौपचारिक गप्पांच्या ओघात त्याने त्याच्या त्या चिरपरिचित आणि मनमोकळ्या हास्यासह केलेले एक खुसखुशीत विधान माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे. तो म्हणाला होता :“मनोविकारशास्त्रातील जीवशास्त्र हे अतिबुद्धिवान लोकांसाठी असेलही; पण आपण मात्र मनाची साधी-सरळ माणसे आहोत. म्हणूनच, आपण मनाचे उपचार मनाच्याच माध्यमातून करतो!”

निखळलेला कोपरा...

आनंदचा हा प्रवास सोपा नव्हता. लहानपणी झालेल्या पोलिओच्या आघाताने त्याला शारीरिक मर्यादा दिल्या. पण, त्याच्या मनाला मात्र अथांग क्षितिज दिले. या संघर्षातूनच त्याच्यात ती अफाट संवेदनशीलता निर्माण झाली, जिने पुढे हजारो रुग्णांचे आयुष्य प्रकाशमान केले. तो केवळ साध्या रुग्णांचा डॉक्टर नव्हता; ‘देवराई’सारख्या चित्रपटांतून ‘स्किझोफ्रेनिया’सारखे क्लिष्ट विषय सुलभ करून मांडले. ‘बायोलॉजी’पेक्षा ‘माईंड’वर त्याचा जो विश्वास होता, तो त्याच्या या अष्टपैलू कार्यातून सतत झळकत राहिला.

वैद्यकीय जगतातील हा तर्कवादाचा प्रसारक, अथांग प्रतिष्ठा, संसर्गजन्य ऊब आणि अफाट ऊर्जेचे मूर्तिमंत रूप असलेला अद्भुत, रचनात्मक ‘हीलर’ आणि आमचा सहकारी आज दूरच्या प्रवासाला निघून गेला आहे. त्याची संवेदनशीलता आणि अथांग सृजनशीलता आमच्या अवतीभोवती एखाद्या संथ, सुजाण प्रकाशासारखी रेंगाळत राहील.





प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.