मुंबई : (Amit Satam) मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी शाळांसाठी राखीव असलेले भूखंड खाजगी संस्थांना वाटप करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) धोरणावर तीव्र आक्षेप घेतला असून, अशा पाच भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले.
अमीत साटम या पत्रात म्हणाले की, "पालिकेने मुंबई महापालिका शाळांसाठी राखीव असलेले पाच भूखंड खाजगी संस्थांना पीपीपी मॉडेलअंतर्गत वाटप करण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे. हे धोरण अशा काळात तयार करण्यात आले, जेव्हा मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नव्हती. धोरणातील अटी व शर्ती, पालिकेची भूमिका किंवा पालिकेला मिळणारे लाभ यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
लोकप्रतिनिधींशी पुरेशी चर्चा न करता आणि पारदर्शकतेचा अभाव ठेवून हे धोरण घाईघाईने लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे मुंबई महापालिकेच्या हिताला बाधा पोहोचल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मुंबई महापालिका आणि शहराचे व्यापक हित लक्षात घेता, सर्व लोकप्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर या विषयावर सखोल चर्चा करण्याची गरज आहे."
ते पुढे म्हणाले की, "मुंबई महापालिकेने पाच भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करावे. धोरणाचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी एक समिती नेमावी. पालिका सभागृहात सविस्तर चर्चा करावी आणि त्यानंतर संतुलित व सर्वसमावेशक धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी," अशी मागणी त्यांनी केली.(Amit Satam)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....