भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ २८ वर्षांनी सिक्कीमची राजेशाही संपली. तिथल्या ९७ टक्के जनतेने भारतासोबत जाण्याचा निर्णय दिला. दि. १६ मे १९७५ रोजी सिक्कीम भारतात विलीन झाले. सिक्कीम भारतात विलीन होण्यामागची कारणे एखाद्या रहस्यमय, थरारक, रंजक चित्रपटालाही लाजवतील अशी आहेत. जागतिक शह-काटशह आणि भारत, तसेच भारतीय धुरंधर एक ना अनेक! सदर लेखात त्यातील काही घटनांचा घेतलेला संक्षिप्त आढावा...
भारत स्वतंत्र झाला. मात्र, सिक्कीमचे राजा ताशी नामग्याल यांनी भारताशी १९५० मध्ये करार केला की, "सिक्कीम भारतात विलीन होणार नाही. मात्र, संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्र धोरण याबाबत भारताचे अधिपत्य सिक्कीमवर राहील.” राजाने भारताशी करार केला कारण, राजा जरी बौद्धधर्मीय होता, तरी ६० टक्के जनता हिंदू होती. हिंदू जनतेचे भारताशी धार्मिक, सांस्कृतिक, आत्मिक नाते होते. दुसरीकडे चीन तिबेटवर अत्याचार करत होता. भारताने साथ दिली नाही, तर चीन आक्रमण करून राजेशाही संपवेल आणि सिक्कीम गिळंकृत करेल, ही भीतीही राजाला होतीच. त्यामुळे राजाने भारताशी ‘संरक्षित करार’ केला. मात्र, पुढे जाऊन राजाचा मुलगा राजकुमार पालदेन थोंडुप नामग्याल यांनी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली. संयुक्त राष्ट्राकडे मागणी करून, सिक्कीमला स्वतंत्र देश घोषित करण्याचे विचार ते बोलू लागले. सिक्कीमची जनता भारतासोबत असताना, जनतेच्या विरोधात जाऊन राजकुमार पालदेन अचानक असे का बोलू लागले असतील?
सिक्कीम भारतात कसे विलीन झाले? तर त्यावेळी जगाच्या पटलावर खूप काही घडत होते. आशिया खंडावर वर्चस्व कुणाचे, यावरून अमेरिका आणि रशिया एकमेकांना शह-काटशह देत होते. त्याचवेळी भारत स्वतंत्र झाला. मात्र, सिक्कीम भारतात विलीन झाले नव्हते. तिथे नामग्याल या बौद्ध राजांची राजेशाहीच होती. सिक्कीम भारतात विलीन होण्याऐवजी स्वतंत्र देश म्हणून राहिले, तर त्यावर प्रभाव टाकून आशिया खंडात प्रभाव टाकता येईल, रशियावर मात करता येईल, असा विचार अमेरिका करत होती. सिक्कीमच्या राजाने स्वतंत्र देश म्हणून राहायचा निर्णय घेतल्यास, सिक्कीम भारतात विलीन होऊ शकत नव्हते. याच पार्श्वभूमीवर पुढे सिक्कीममध्ये वेगवान घटना घडल्या.
६०च्या दशकात राजे पालदेन थोंडुप नामग्याल यांना तीन अपत्ये होती. अचानक त्यांच्या पत्नीचे निधन झाले. एकाकी दुखी असलेले पालदेन, शहरातील सगळ्यात महागड्या आणि विलासी बारमध्ये बसले होते. तिथेच अमेरिकेहून एक अतिआधुनिक १९ वर्षांची युवती, होप कुक फिरण्यासाठी आली. तिने पालदेन यांच्याशी ओळख करून घेतली. काहीच दिवसांत त्यांचे प्रेमही झाले. त्या १९ वर्षांच्या युवतीने, तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या ३९ वर्षांच्या राजकुमाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परदेशी अमेरिकन आणि तेही ख्रिश्चन असलेली युवती राजघराण्यात जर सून म्हणून आली आणि पवित्र राजवाड्यात तिचे पाऊल पडले, तर शेकडो वर्षांच्या राजघराण्याचा नाश होईल, खानदान उद्ध्वस्त होईल, असे त्या राजघराण्याच्या धर्मगुरूंनी आणि राजज्योतिषांनी सांगितले. पण, राजकुमार पालदेन त्या युवतीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, त्यांनी ऐकले नाही. १९६३ साली त्यांचा बौद्ध पद्धतीने विवाह झाला. पुढे पाच वर्षांनी इटलीची एडविगे अँटोनिया आल्बिना मैनो यांची ओळख, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांच्याशी झाली. दोघांचा प्रेमविवाह झाला आणि एडविगे अँटोनिया भारताच्या सत्ताधारी घराण्यात ‘सोनिया गांधी’ म्हणून स्थिरावल्या.
असो, विषयांतर झाले. पुन्हा विषयाकडे वळू. त्यानंतर काही काळातच, भारतासोबत जाण्याचा निर्णय घेणार्या ताशी नामग्याल यांचे निधन झाले. पालदेन हे सिक्कीमचे राजे झाले आणि त्यांची भूमिका बदलली. सिक्कीम राज्याने भारताशी कोणताही संबंध न ठेवता स्वतंत्र देश म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागणी करावी, असा विचार पालदेन करू लागले. हे सगळे अतिशय वेगाने घडले. पालदेन यांच्या भूमिकेमागे आणि इतरही घटनांमागे होप कुकच होती, असा संशय व्यक्त होऊ लागला. होप कुकचे आईबाबा लहानपणीच वारले होते आणि तिचे आजोबा हे अमेरिकेचे राजदूत होते. त्यामुळे होप कुक ही अमेरिकेची हस्तक आहे, अशी चर्चा सुरू झाली. सिक्कीमची जनता भारतात सामील होण्यासाठी उठाव करण्याची शक्यता होती. तसे होऊ नये म्हणून, पालदेनच्या सैन्याने जनतेवर निरंकुश सत्ता राबवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे लोक अधिकच भडकले. ‘राजेशाही समाप्त करा, लोकशाही राज्य हवे’ म्हणत जनता रस्त्यावर उतरली. पालदेन यांनी जनक्षोभ चिरडण्याचा प्रयत्न केले.
शांती प्रस्थापित व्हावी या कारणाच्या आड, संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यापाठोपाठ अमेरिका किंवा इतरही परकीय देश सिक्कीममध्ये येतील अशी चिन्हे दिसू लागली. राजा पालदेन परकीय शक्तींच्या मदतीने भारताविरोधात षड्यंत्र रचत आहे, असे दिसू लागताच भारतीय सैन्याने राजाच्या राजवाड्याला चारही बाजूंनी वेढा घातला. अवघ्या ३० मिनिटांत, भारतीय सैन्याने राजासकट सशस्त्र सैन्याला शरण येण्यास भाग पाडले आणि त्यांना निशस्त्र केले. पालदेन राजांना त्यांच्या राजवाड्यातच सुरक्षितपणे नजरकैदेत ठेवण्यात आले. लष्कराच्या या कारवाईनंतर अवघ्या पाच दिवसांनी, दि. १४ एप्रिल १९७५ रोजी सिक्कीममध्ये एक ऐतिहासिक जनमत चाचणी घेण्यात आली. यामध्ये भारतीय लष्कराच्या दबावाशिवाय, सिक्कीमच्या ९७.५५ टक्के जनतेने राजेशाही पूर्णपणे संपवण्याच्या आणि स्वेच्छेने भारतात विलीन होण्याच्या बाजूने मतदान केले. शेवटी, दि. १६ मे १९७५ रोजी सिक्कीम भारतात विलीन झाले.
मात्र, चीनने २००२ पर्यंत सिक्कीम हे भारताचे राज्य नसून, स्वतंत्र देश असल्याचे त्यांच्या नकाशात दाखवले. मात्र, स्व. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी आक्रमक परराष्ट्रनीतीचा अवलंब करत, चीनशी वाटाघाटी केल्या. चीनने सिक्कीमला त्यांच्या नकाशात भारताचे राज्य म्हणून स्वीकारले. अर्थातच, चीन स्वीकारतो का नाही, याच्याशी आजच्या भारताला काहीच देणे-घेणे नाही. सिक्कीमच्या विलीनीकरणाची कथा सांगण्याचा हेतू हाच की, या देशाला तोडण्यासाठी अनेक दुष्टशक्ती पूर्वीही कार्यान्वित होत्या, आजही आहेत. पण, ‘भारत झिंदाबाद था, झिंदाबाद है आणि झिंदाबाद रहेगा!’ सिक्कीमच्या विलीनीकरणाची कथासुद्धा हेच सांगते.
सिक्कीमच्या विलीनीकरणाचा धुरंधर!
सिक्कीम भारतात विलीन झाला आणि राणी होप कुक अमेरिकेला निघून गेली. तिने तिच्या आत्मचरित्रामध्ये लिहिले की, "भारताचे गुप्तहेर राजवाड्यात सर्वत्र होते- स्वयंपाकी, माळी आणि स्वच्छताकर्मीसुद्धा. मी आणि पालदेन शयनगृहात काय बोललो, काय चर्चा केली, याची बित्तंबातमी भारताला मिळत होती. त्यामुळेच पालदेनने संयुक्त राष्ट्रसंघाला भारतात आमंत्रित करण्याचे नुसते म्हटल्याबरोबर, काहीच तासांत भारतीय सैन्याने राजवाड्याला घेराव घालून आम्हाला बंदी केले. तसेच जनतेनेही भारतीय सैन्याला साथ दिली.” होप कुकचे म्हणणे अगदी खरे होते.
पाकिस्तानमध्ये सध्या ‘अज्ञात’ व्यक्तींचे जे तांडव सुरू आहे, तेच आणि तसेच तांडव त्यावेळी सिक्कीममध्ये सुरू होते. कारण, सिक्कीममध्येही एक ‘धुरंधर’ त्यावेळी होता. सिक्कीमचे शेवटचे राजे (पालदेन) आणि त्यांची अमेरिकन पत्नी होप कुक यांच्या माध्यमातून, अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘सीआयए’ हिमालयातील या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात आपला प्रभाव वाढवत होती. उत्तरेकडे चीनचा धोका आणि राजवाड्यातील भारतविरोधी कारवाया लक्षात घेऊन, दिल्ली सरकारने ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या एका तरुण अधिकार्याला सिक्कीममध्ये पाठवले. हा तरुण तिथे ‘सबसिडियरी इंटेलिजन्स ब्युरो’ (एसआयबीचा) प्रमुख म्हणून कार्यरत होता. या तरुणाने सिक्कीममध्ये भूमिगत राहून, स्थानिक लोकांमध्ये प्रवेश केला. सिक्कीममधील राजेशाहीविरोधी पक्षांना, विशेषतः काझी लेंडुप दोरजी यांच्या ‘सिक्कीम नॅशनल काँग्रेस’ला एकत्र आणण्यात आणि बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक वृत्तपत्रे आणि विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी, राजवाड्यातील अंतर्गत कारवाया आणि अमेरिकन राणीच्या संशयास्पद भूमिकेबद्दल जनजागृती केली. त्यामुळे राजाविरोधी लाट अधिक तीव्र झाली. तरुणाने साम-दाम-दंड-भेद वापरून, सिक्कीमच्या जनतेमध्ये धर्मसंस्कृती प्रेम आणि भारतप्रेम प्रज्वलित केले. जनतेला भारतासोबत राहायचे आहे हा गुप्त अहवाल, त्या तरुणानेच भारत सरकारला दिला होता. त्यानुसार, भारतासोबत जायचे की नाही ही जनमत चाचणी जेव्हा घेतली गेली, तेव्हा सिक्कीमच्या ९७ टक्के जनतेने भारतासोबत जाण्यासाठी मतदान केले. सिक्कीमच्या भारतामधील विलीनीकरणामध्ये सिंहाचा वाटा असणारा हा धुरंधर कोण होता? तो तरुण, ते धुरंधर होते, अजित डोवाल!
९५९४९६९६३८