शिवसेना चिन्ह सुनावणीवरून काही राजकीय नेत्यांच्या बेजाबदार वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालय नाराज.
16-May-2026
Total Views |
मुंबई : (Shiv Sena Symbol Dispute) शिवसेना पक्षचिन्ह वादाच्या सुनावणीवरून काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार दि.१५ रोजी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सुप्रीम कोर्ट मुद्दाम सुनावणी घेत नाही,” अशा प्रकारची माध्यमांमधील वक्तव्यं अस्वीकार्य असल्याचं सांगत न्यायालयाने संबंधित नेत्यांना इशारा दिला.या प्रकरणातील सुनावणी लांबत असल्याबद्दल ठाकरे गटातील काही नेत्यांनी सार्वजनिक नाराजी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेत अशा वक्तव्यांवर कठोर भूमिका घेतली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सुनावणीची तारीख निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त करत, “आम्ही तारीख निश्चित करू, पण आधी तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, अशी बेजबाबदार वक्तव्यं करणं थांबवायला सांगा.” असे स्पष्ट शब्दांत सुनावले.(Shiv Sena Symbol Dispute)
न्यायालयाने म्हटले की," न्यायप्रक्रियेबाबत सार्वजनिकरीत्या दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही. न्यायालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने संस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम करू शकतात."
त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी संयम राखण्याची गरज असल्याचंही न्यायालयाने सूचित केलं.(Shiv Sena Symbol Dispute)
शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाकडे राहणार, यावरून उद्धव ठाकरे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देत पक्षचिन्ह बहाल केलं होतं. त्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ठाकरे गटाच्या वतीने वकील म्हणून देवदत्त कामत काम पाहत आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.(Shiv Sena Symbol Dispute)