समुद्र, तलाव आणि नद्यांमधील पर्यटनाचा अनुभव, आता केवळ श्रीमंतांच्या यॉटपुरता मर्यादित राहिलेला नाही. जगभरात साहसी पर्यटन, वॉटर स्पोर्ट्स आणि आरामदायी जीवनशैलीकडे वाढणारा कल, यामुळे ‘रेक्रीएशनल बोट्स’ उद्योगाचा विकास वेगाने होत आहे. मोटरबोट, सेल बोट, फिशिंग बोट, पर्सनल वॉटरक्राफ्ट्स (जेट स्की) आणि लझरी यॉट्स यांचा समावेश असलेला हा उद्योग, आता जागतिक पर्यटन आणि मनोरंजन अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग झाला आहे.
मनोरंजनासाठी बोटिंग करण्याला १७व्या शतकापासूनचा इतिहास आहे. सुमारे १७व्या शतकात इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाली. थेम्स नदीवर राजघराण्यातील सदस्य आणि सरदार मंडळी, नौकाविहाराचा आनंद घेत असत. इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यालाच जगातील पहिला ‘यॉट्समन’ मानले जाते. तो नदीवर नियमित नौकाविहार करू लागला. इतिहासकारांच्या मते, त्याने आयुष्यात जवळपास २० यॉट्स तयार केल्या. त्याच्या या छंदामुळे, उच्चभ्रू समाजात बोटिंगची आवड वाढली आणि त्यातूनच जगातील पहिल्या ‘सेलिंग लब’चीही स्थापना झाली.
१८व्या शतकाच्या सुरुवातीला नौकाविहार करणारे अनेक श्रीमंत लोक एकत्र आले आणि त्यांनी, औपचारिक ‘बोट लब’ सुरू केले. आयर्लंडमधील ‘द वॉटर लब ऑफ द हार्बर ऑफ कॉर्क’ हे जगातील पहिले ‘बोट लब’ मानले जाते, तर काही इतिहासकार रशियातील ‘नेव्हा यॉट लब’ला पहिले स्थान देतात. अमेरिकेमध्ये १८३९ला डेट्रॉईट येथे पहिले ‘बोटिंग लब’ स्थापन झाले. सुरुवातीच्या काळात बोटिंगचे स्वरुप, नौकानयन किंवा वल्हवणे असेच होते. त्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज भासत असे. श्रीमंत लोक स्वतःसाठी खलाशी ठेवत असत.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन अभियंता गॉटलिब डेमलर यांनी, एक अंतर्गत ज्वलन इंजिन विकसित केले आणि बोटिंग क्षेत्रात मोठीच क्रांती घडली. मोटरबोट्समुळे बोट चालवणे अधिक सोपे झाले. १९०३ मध्ये ‘हार्मस्वर्थ कप’ ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय मोटरबोट शर्यत झाली. त्यानंतर १९१० मध्ये आऊटबोर्ड मोटर्स आल्याने, बोटिंग अधिक स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ झाले. अमेरिकन संशोधक जॉन एल. हॅकर यांनी तयार केलेली ‘किटी हॉक’ ही बोट, ताशी ५० मैल वेगाने धावणारी पहिली बोट ठरली आणि आधुनिक बोटिंगच्या नव्या युगाची सुरुवात झाली.
२०२४ मध्ये जागतिक ‘रेक्रीएशनल बोट्स’ बाजारपेठेचे मूल्य, सुमारे १९.८८ अब्ज डॉलर्स इतके होते. २०३३ पर्यंत ही बाजारपेठ तब्बल ३७.९६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच, जवळपास ७.४५ टक्के वार्षिक दराने, हा उद्योग वाढत आहे. उत्तर अमेरिका ही या उद्योगाची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेत बोटिंग ही केवळ हौसच नसून, ती एक जीवनशैलीदेखील मानली जाते.
फ्लोरिडा, मिशिगन आणि कॅलिफोर्निया यांसारख्या किनारी राज्यांमध्ये मरीना, बोट लब्स आणि वॉटर टुरिझमला प्रोत्साहन दिले जाते आहे. युरोपमध्ये ‘सेलिंग’ संस्कृती आणि सागरी पर्यटनामुळे, या उद्योगाला मोठाच आधार मिळत आहे. ग्रीस, क्रोएशिया आणि इटलीमध्येही ‘सेलिंग हॉलिडे’ची लोकप्रियता सातत्याने वाढती आहे. ब्रिटनमध्ये ‘रॉयल यॉटिंग असोसिएशन’च्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत ‘सेलिंग’ प्रशिक्षणाच्या नोंदणीमध्ये १५ टक्क्यांची वाढ झाली. आशिया-प्रशांत क्षेत्रातही हा उद्योग झपाट्याने विस्तारत आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपान या पारंपरिक बाजारपेठा असल्या, तरी चीन, थायलंड आणि मलेशियांसारख्या देशांमध्ये लझरी पर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्समुळे मागणी वाढती आहे. थायलंडमधील फुकेत आणि मलेशियातील लंगकावी येथही, आधुनिक मरीना विकसित करण्यात येत आहेत.
तरुण पिढीमध्ये साहसी पर्यटन आणि वेगवान जलक्रीडांची वाढती आवड पाहता, ‘पर्सनल वॉटरक्राफ्ट्स’ अर्थात, ‘जेट स्की’कडे कल वाढतो आहे. त्याचप्रमाणे फिशिंग बोट्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेच्या नागरिकांमध्ये मासेमारी हा लोकप्रिय मनोरंजन प्रकार असून, त्यामुळे तेथे फिशिंग बोट्सची मागणी वाढली आहे. जागतिक पर्यटन, साहसी जीवनशैली आणि लझरी अनुभवांच्या वाढत्या मागणीमुळे, ‘रेक्रीएशनल बोट्स’ उद्योग आगामी दशकात जागतिक अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास येईल, यात शंका नाही.