नीट पेपरफुटी प्रकरणाचा सूत्रधार पुण्यातील रसायनशास्त्राचा प्राध्यापक

    16-May-2026
Total Views |
NEET Paper Leak
 
पुणे : (NEET Paper Leak) नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराची ओळख पटवल्याचा दावा सीबीआयने केला आहे. पुण्यातील पी. व्ही. कुलकर्णी नावाचा रसायनशास्त्राचा प्राध्यापक हा पेपरफुटीचा प्रमुख सूत्रधार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे.
सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार,प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कामात सहभागी होता. त्यामुळे कुलकर्णी याला नीटच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत प्रवेश मिळाला होता.
 
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी याने दुसरी आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना एकत्र केलं असल्याचंही तपासात उघड झालेलं आहे.सीबीआयने १४ मे रोजी मनीषा वाघमारेला अटक केली होती. पुण्यातील स्वतःच्या घरी कुलकर्णी यांनं या विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेतले. या क्लासमध्ये प्रश्न, पर्याय आणि योग्य उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी ही प्रश्नोत्तरं त्यांच्या वहीत हस्तलिखित स्वरूपात लिहून घेतली होती.
 
हेही वाचा :  नीट-यूजी पेपरफुटीविरोधात अभाविपचे एनटीए मुख्यालयासमोर आंदोलन
 
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या वह्यांमधील प्रश्न आणि ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका यांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये बरेचसे प्रश्न जुळत असल्याचं सीबीआने म्हटलेले आहे.(NEET Paper Leak)
 
या प्रकरणात आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींना पुणे न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आलं असून त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात येत आहे.(NEET Paper Leak)
 
सीबाीआय आता या रॅकेटचं नेटवर्क किती मोठं होतं, किती विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि प्रश्नपत्रिका आणखी कुणाकडे पोहोचली होती का, याचा तपास करत आहे. देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीटच्या विश्वासार्हतेवर या प्रकरणामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.(NEET Paper Leak)