महानगरपालिकेच्‍या आरोग्य संस्थांचा परिसर अतिक्रमणमुक्त करा - आयुक्‍त अश्विनी भिडे

    16-May-2026   
Total Views |
Mumbai Municipal Corporation
 
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य संस्थांचा परिसर स्वच्छ, आकर्षक आणि अतिक्रमणमुक्त करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शनिवारी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या मासिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
 
आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, "मुंबईकरांच्या आरोग्यसेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुमारे ५०० हून अधिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, ‘हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे, विशेषोपचार रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे २ कोटींहून अधिक नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतात. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा विस्तार, आधुनिकता आणि वैद्यकीय सेवांची गुणवत्ता सातत्याने अधिक सक्षम व उंचावत आहे.
 
मात्र, उत्कृष्ट आरोग्यसेवेसोबतच या सर्व आरोग्य संस्थांचा परिसरही स्वच्छ, अतिक्रमणमुक्त आणि नागरिकांच्या दैनंदिन वावरासाठी सुसज्ज असणे तितकेच महत्त्वाचे आहे. दवाखाने व रुग्णालयांच्या इमारती आकर्षक, एकसमान रंगसंगतीने उठावदार दिसाव्यात, परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीमुळे या आरोग्य संस्थांचे दर्जेदार स्वरूप कायम राखले जावे."
 
प्रशासकीय विभागांच्‍या (वॉर्ड) सहायक आयुक्‍तांनी विविध आरोग्‍य संस्‍थांना स्‍वयंप्रेरणेने भेट देऊन परिसर स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, दुरुस्तीची कामे, रंगसंगती आणि नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.(Mumbai Municipal Corporation)
 
 
त्या पुढे म्हणाल्या की, "आरोग्‍य संस्‍थांच्‍या इमारतींचे संरचनात्मक सुरक्षा लेखापरीक्षण, आवश्यक दुरुस्ती आणि नियमित देखभाल वेळोवेळी करून आरोग्य संस्थांची गुणवत्ता व विश्वासार्हता कायम राखावी. महानगरपालिकेच्या गरजेनुसार सुरक्षा व गृहव्यवस्थापन (हाऊसकीपिंग) कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी. यासोबतच आरोग्य संस्थांचे दिशादर्शक फलक, सुशोभीकरण आणि एकूण सादरीकरण अधिक आकर्षक, सुबक व नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्‍यात. संबंधित विभागांच्‍या सहायक आयुक्‍तांनी आरोग्‍य संस्‍थांना नियमितपणे भेट द्यावी. विभागांच्या सहायक अभियंता (परिरक्षण) यांनी आरोग्य संस्थांच्या देखभाल, दुरुस्ती व आवश्यक परिरक्षण कामांची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी."
 
३१ मे पर्यंत रस्ते विकास कामे पूर्ण करा
 
त्या म्हणाल्या की, "सध्या सुरू असलेली सर्व रस्त्यांची कामे दि. ३१ मे पर्यंत पूर्णत्वास नेण्यात यावीत. रस्त्यांची कामे करताना केवळ तुकड्यांमध्ये नव्हे, तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावा. ज्या ठिकाणी या हंगामात काँक्रिट रस्त्यांची कामे होणे शक्य नाही, त्या ठिकाणी काँक्रिट रस्त्यांप्रमाणेच दर्जेदार मास्टिक रस्ते तयार करण्यात यावेत. हे रस्ते वाहतुकीस सुरक्षित, सुयोग्य आणि एकसमान पातळीचे असावेत; कुठेही उंचसखलपणा राहू नये. शाळा, रुग्णालये आणि संवेदनशील ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेले गतिरोधक पुन्हा स्थापित करण्यात यावेत. तसेच, वाहतूक सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी थर्मोप्लास्टिक मार्किंग, रंबलर स्ट्रिप्स आदी आधुनिक पर्यायांचाही आवश्यकतेनुसार वापर करण्यात यावा."(Mumbai Municipal Corporation)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....