१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी;६१ दिवस यंत्रचलित नौकांवर बंदी; नियमभंग केल्यास जप्तीची कारवाई

Total Views |
Maharashtra Fishing Ban
 
मुंबई : (Maharashtra Fishing Ban) राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि मासळीच्या प्रजनन काळाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यंदाही पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्याच्या क्षेत्रीय सागरी जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सलग ६१ दिवस लागू राहणाऱ्या या बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मस्त्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.
 
मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले की, पावसाळ्यात मासळीच्या विविध प्रजातींचा प्रजनन काळ सुरू असतो. या काळात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक पद्धतीने मासेमारी झाल्यास मत्स्यसंपत्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनाच लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना त्यातून सूट देण्यात आली आहे. (Maharashtra Fishing Ban)
 
१ जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक
 
सध्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनी १ जून २०२६ पूर्वी संबंधित मासेमारी बंदरात परतणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच बंदी कालावधीत म्हणजेच ३१ जुलैपर्यंत अशा नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. बंदी काळात राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी नौकांच्या अवागमनावरही निर्बंध राहणार आहेत. (Maharashtra Fishing Ban)
 
 
२ सागरी मैलांपर्यंत बंदी लागू
 
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. या क्षेत्रात कोणतीही यंत्रचलित किंवा यांत्रिक नौका मासेमारी करताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, १२ सागरी मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाचे स्वतंत्र धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
 
नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
 
पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम २०२१ अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कलम १४ नुसार मासेमारी करताना आढळलेल्या नौका, त्यावरील यंत्रसामुग्री, मासेमारी साहित्य तसेच नौकेत सापडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय कलम १७ मधील तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. (Maharashtra Fishing Ban)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.