साहित्य संस्था लोकाभिमुख असणे आवश्यक : डॉ. धनश्री साने

    16-May-2026   
Total Views |
Dr Dhanashree Sane
 
साहित्य, संस्कृतीची, प्रबोधनाची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात येणार्‍या काळात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनदेखील पुण्यात संपन्न होणार आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’च्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. या संमेलनात साहित्य परिषदेच्या विविध शाखांचा सुद्धा सहभाग असेल. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या डोंबिवली शाखेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. धनश्री साने यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
 
‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्यानंतर आपल्या काय भावना होत्या?
 
‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी निवड होणं, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि त्याचबरोबर जबाबदारीचीसुद्धा गोष्ट आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ ही साहित्य, संस्कृती, समाजकारण या गोष्टींमध्ये समन्वय साधणारी, तसेच अनेक लेखकांना घडवणारी संस्था आहे. सर्व सदस्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आमच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे मी सर्वांची ऋणी आहे.
 
‘मसाप’च्या डोंबिवली शाखेशी आपला संबंध कधी आला? आपल्या आयुष्यात या संस्थेचे स्थान काय?
 
एक साहित्यप्रेमी म्हणून ‘मसाप’शी माझा संबंध अत्यंत जुना आहे. १९९७ पासून मी परिषदेची सभासद आहे. डोंबिवली शाखेच्या माध्यमातून साहित्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करत असू. यामुळे या संस्थेबरोबरच इथल्या माणसांसोबत माझे नाते अधिकच दृढ झाले. ‘मसाप’ही केवळ संस्था नसून संस्कृती जपणारे व्यासपीठ आहे. माझ्या पिढीतील अनेकांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे.
 
आपल्या कारकिर्दीमध्ये ‘मसाप’ डोंबिवलीमध्ये आपण कोणकोणते नवीन उपक्रम राबविणार आहात?
 
पारंपरिक कार्यक्रमांसोबत युवा पिढीला आकर्षित करतील, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत. साहित्यसंबंधी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे, डिजिटल साहित्य मंच, शाळा-महाविद्यालयांतील वाचनसंस्कृती, ग्रामीण भागातील साहित्यिकांपर्यंत पोहोचणे, अशा अनेक लोकाभिमुख आणि वाचकाभिमुख, तसेच सर्व समावेशक कार्यक्रमांची आखणी आम्ही करणार आहोत. आमच्या नव्या कार्यकारिणीच्या सहकार्याने निश्चितच हे उपक्रम यशस्वी करू.
 
नुकत्याच पार पडलेल्या ‘मसाप’ डोंबिवली शाखेच्या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा माध्यमांवर रंगली होती. त्याविषयी काय सांगाल?
 
कोणत्याही संस्थेमधून निवडणुका झाल्यानंतर विविध चर्चा होणे स्वाभाविक असते. हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. ‘मसाप’ ही साहित्य संस्कृतीला वाहिलेली संस्था आहे. तिचे केंद्र साहित्यच राहिले पाहिजे, यात काही दुमत नाही. जिथे काही प्रमाणात मतभेद राहिले असतील, ते सामोपचाराने सोडवता येतील. संवादाच्या माध्यमातून समस्यांवर तोडगा काढता येईल. सगळ्यांना सोबत घेऊन एक सकारात्मक विचार घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, हे नक्की.
 
१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘मसाप’ डोंबिवली शाखेची काय भूमिका असेल?
 
१००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी साहित्य विश्वातील एक ऐतिहासिक घटना आहे. या संमेलनात वेगवेगळ्या साहित्यिक संस्था आणि वाचक विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. यासाठी डोंबिवली शाखा, पुणे येथील ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील. १००व्या संमेलनाआधी ९९ ठिकाणी विविध संमेलने पार पडणार आहेत. त्यामध्येसुद्धा डोंबिवली शाखा सक्रिय असेल. बालवाचकांना किंवा युवा वर्गाला आकर्षित करणारे असे संमेलन डोंबिवलीत करण्याचा आमचा मानस आहे.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.