काँग्रेस काळातील इंधन दरवाढ मोदी सरकारपेक्षा अधिक! काँग्रेसला स्वकृत्यांचाच सोयीस्कर विसर!
काँग्रेसला स्वकृत्यांचाच सोयीस्कर विसर!
16-May-2026
Total Views |
मुंबई : (Diesel Price India) जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन दरवाढ केल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, यामुळे महागाई भडकणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांनीही मोदी सरकारच्या चुकांची किंमत जनतेला चुकवावी लागाणार असल्याची टीका केली. मात्र, संपुआच्या काळात झालेली इंधन दरवाढ ही मोदी सरकारपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीवर नजर टाकली असता स्पष्ट होते. (Diesel Price India)
जागतिक संघर्षाच्या काळात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने, जगातील प्रत्येक देशानेच इंधनदरवाढ केली. भारतातही पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी तीन रुपये, तर सीएनजी दोन रुपयांनी महाग झाला आहे. यावरुन टीका करणार्या काँग्रेसला संपुआच्या काळातील इंधनदरवाढीचा विसर पडलेला दिसतो.
संपुआच्या काळात झालेली दरवाढ ही मोदी सरकारच्या तुलनेत सर्वाधिक असून, दि. 1 एप्रिल 2004 ते दि. 12 एप्रिल 2014 या कालावधीत पेट्रोलच्या किमतीमध्ये तब्बल 114.4 टक्क्यांची वाढ झाली होती, तर, डिझेलच्या किमतीमध्येही 155.2 टक्क्यांची वाढ देशाने अनुभवली होती. 2004 मध्ये 33.71 रुपयांवरुन पेट्रोलचे दर 2014 मध्ये 72.26 रुपयांवर पोहोचले होते, तर डिझेलने 21.74 वरुन 55.49 रुपयांची उंची गाठली होती. संपुआच्या तुलनेत मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांत पेट्रोलमध्ये झालेली वाढ 35.3 टक्के असून, डिझेलमध्येही 63.4 टक्के वाढ झाली आहे.(Diesel Price India)
तथापि, संपुआ काळात महागाईनेही दोन अंकी उच्चांक अनेकदा गाठला असताना, त्याची भलामण करताना काँग्रेसचे तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांनी “जनता 15 रुपयांची पाण्याची बाटली खरेदी करु शकते, पण तांदळांच्या किमतीमध्ये एक रुपया वाढल्यास आंदोलन करते,” अशी टीकाही केली होती. मात्र, आता या सगळ्याचाच काँग्रेसला सोयीस्कर विसर पडलेला दिसतो.(Diesel Price India)
भारताच्या शेजारील देशातील इंधनाचे दर (दर संबंधित देशाच्या चलनानुसार)
देशाचे नाव पेट्रोलचे दर डिझेलचे दर
1. नेपाळ 214.50 225
2. पाकिस्तान 458.86 520.42
3. श्रीलंका 470 458
4. बांगलादेश 109 95
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचे सकारात्मक परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना विनाकारण सोने खरेदी न करण्याचे आणि इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला भारतीय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असून, त्याचे सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार परकीय चलनसाठ्यामध्ये तब्बल 60 हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून, सलग दोन आठवडे हा चलनसाठा घसरल्यानंतर ही वाढ झाली आहे. तसेच, सोन्याच्या साठ्यातही वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकने म्हटले आहे.(Diesel Price India)