धारावी प्रकल्प विरोधकांचा भास्कर शेट्टींकडून समाचार

Total Views |

 Dharavi Redevelopment Project

 
मुंबई : (Dharavi Redevelopment Project) धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत 'अनिर्णित' किंवा प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांच्या जलद निवारणासाठी सध्या धारावीत विशेष दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) आणि पडताळणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेला स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला असतानाच, काही विरोधी पक्षांकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर, धारावी प्रभाग क्रमांक १८८ चे नगरसेवक भास्कर शेट्टी यांनी जाहीर पत्रक काढून या शिबिरांना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
 

नगरसेवक भास्कर शेट्टी यांनी धारवीतील तमाम रहिवाशांना आवाहन केले आहे की, "डीआरपी योजनेअंतर्गत हक्काचे घर आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे". तसेच, विरोधी पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी धारवीकरांना या सुवर्णसंधीपासून दूर ठेवत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून पात्र नागरिकांना या प्रक्रियेत मदत करावी, असेही ते म्हणाले. (Dharavi Redevelopment Project)
 

अनिर्णित प्रकरणांचा घोळ संपणार; ९०% प्रकरणांवर तोडगा
 

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसी फोटोपासवरील तारखांबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशांची पात्रता 'अनिर्णीत' किंवा प्रलंबित ठेवण्यात आली होती. मात्र, आता यातील तब्बल ९०% प्रकरणांमधील गोंधळ दूर करण्यात आला असून, उर्वरित प्रकरणांवर वेगाने काम सुरू आहे. या विशेष शिबिरांमध्ये सिंगल-विंडो (एक खिडकी) पद्धतीद्वारे कागदपत्रांची पडताळणी करून रहिवाशांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. (Dharavi Redevelopment Project)
 
 

दि.१४ ते दि.२६ मे दरम्यान विशेष मोहीम
 

डीआरपी-एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनानुसार, हे विशेष कॅम्प दि.१४ ते दि.२६ मे दरम्यान धारवीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये धारवीतील सर्व पाच सेक्टरमधील रहिवाशांसह रेल्वेच्या जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही.
 

सर्वपक्षीय बैठकीत झाली होती चर्चा
 

या शिबिरांचे नियोजन करण्यापूर्वी प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शिवसेना (शिंदे गट) कडून भास्कर शेट्टी, शिवसेना (ठाकरे गट) कडून अर्चना शिंदे, जोसेफ कोली, हर्षला मोरे, तसेच काँग्रेस पक्षाच्या नेत्या आशा काळे आणि साजिदाबी बब्बू खान यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट) कडून भास्कर शेट्टी यांनी या शिबीराच्या आयोजनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र या बैठकीत आपण या शिबिराच्या आयोजनाला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. (Dharavi Redevelopment Project) 
 

 





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.