अधिक मासाचे खगोलशास्त्र

    16-May-2026
Total Views |
Astronomy Behind Adhik Maas
 
यंदा रविवार, दि. १७ मेपासून ते १५ जूनपर्यंत अधिक ज्येष्ठ महिना आहे. एरव्ही अधिक मासाचे धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्व आपल्या परिचयाचे असते. परंतु, अधिक मास कालगणनेत नेमका का घ्यावा लागतो? तो केव्हा येतो? कुठला महिना अधिक घ्यायचा, हे कसं ठरतं? यांसारख्या प्रश्नांमागे खगोलशास्त्र दडलेलं आहे. तेव्हा, आजच्या लेखातून अधिकमासाचं खगोलीय महत्त्व जाणून घेऊया...
 
तिथींवर आधारित असलेले आपले सण दरवर्षी त्याच तारखेला येत नाहीत. यामागचं कारण म्हणजे, चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांच्यातील फरक. चैत्र ते फाल्गुन या १२ महिन्यांच्या वर्षाला आपण ‘चांद्रवर्ष’ म्हणतो. चांद्रवर्षाचे एकक ‘तिथी’ आहे. प्रत्येक चांद्रमहिना ३० तिथींचा असतो.(अमावस्या - पौर्णिमा आणि पुन्हा अमावस्या) अमावस्या संपली की पुढील महिन्याचा प्रारंभ होतो. लागोपाठच्या दोन अमावस्यांमधील कालावधी सरासरी साडे-एकोणतीस दिवसांचा असतो. चांद्रमहिन्याचा हा कालावधी विचारात घेतला, तर चांद्रवर्ष २९.५ एका महिन्याचे दिवस गुणिले १२ चांद्रमहिने म्हणजे ३५४ दिवसांचे होते. परंतु, ऋतूंचे वर्ष म्हणजेच सौरवर्ष (जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो) सरासरी ३६५ दिवसांचे असल्याने प्रत्येक चांद्रवर्षी एखादा सण साधारण ११ दिवसांनी मागे सरकतो. २०२५ साली दि. ३० मार्च रोजी असलेला गुढीपाडवा २०२६ रोजी दि. १९ मार्चला आला. अशा तर्‍हेने दरवर्षी गुढीपाडवा ११ दिवसांनी मागे जात राहिला, तर आपल्या आयुष्यातच तो ऐन डिसेंबर महिन्यात येईल. हा ११ दिवसांचा फरक दर एका वर्षाला येतो. म्हणजेच, साधारण तीन वर्षांनी हा फरक ३३ दिवसांचा किंवा सुमारे एका महिन्याचा होतो. म्हणून साधारण तीन वर्षांच्या कालावधीनंतर अधिक महिना घेतला की मागे आलेला सण पुढे सरकतो आणि त्याचा ऋतूंशी मेळ राहतो. सणांचा ऋतूंशी मेळ बसवण्यासाठी सुमारे ३२ ते ३५ चांद्रमहिन्यांनी आपण अधिक मास घेतो. अधिक मास का येतो आणि केव्हा येतो, हे एव्हाना या माहितीवरून स्पष्ट झालं. आता कुठला महिना अधिक घ्यायचा, हे कशाच्या आधारावर ठरतं, तेही आपण जाणून घेऊ.
 
ज्या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र चित्रा नक्षत्राजवळ असतो, तो चैत्र. तसेच, पौर्णिमा ज्येष्ठा नक्षत्राजवळ झाली, तर तो महिना ‘ज्येष्ठ महिना’ म्हणून ओळखला जातो. परंतु, नक्षत्र-सान्निध्याने चांद्र महिन्याचे नाव ओळखले जात असले, तरी चांद्रमहिन्याचे नाव ठरविण्याचा तो निकष नव्हे. चांद्रमहिन्याचे नाव सूर्य ठरवितो. राशींचा आणि महिन्यांचा क्रम माहीत असेल, तर तुम्हालाही ते समजेल. राशी १२ आणि महिनेही १२. त्यामुळे सूर्याचे राशीस्थान आणि महिन्याचे नाव यांची एकास एक संगती आहे. उदाहरणार्थ, मीन राशीत सूर्य असताना सुरू होणारा महिना चैत्र. मेष राशीत सूर्य असताना सुरू होणारा महिना वैशाख याप्रमाणे क्रम चालू राहतो.
 
चालू वर्षी म्हणजे २०२६ मध्ये सूर्याचा वृषभ राशीतील प्रवेश शुक्रवार, दि. १५ मे रोजी सकाळी ६.२१ वाजता झाला. त्यानंतर अमावस्या आहे. अमावस्या रविवार, दि. १७ मे मध्यरात्रीनंतर १.३१ वाजता संपेल. या अमावस्या समाप्तीनंतर सुरू होणार्‍या महिन्याला काय नाव द्यायचे? अमावस्या समाप्तीवेळी सूर्य वृषभ राशीत असल्यामुळे रविवार, दि. १७ मेपासून सुरू होणार्‍या महिन्याचे नाव नियमाप्रमाणे ‘ज्येष्ठ’ असे ठेवावे लागेल. यानंतरची अमावस्या दि. १५ जूनला सकाळी ८.२४ वाजता संपते. आता नव्याने सुरू होणार्‍या महिन्याला नाव देण्यासाठी आपण सूर्य कोणत्या राशीत आहे, हे पहिले. सूर्याने अजून रास बदलली नव्हती. तो वृषभ राशीतच होता.त्यामुळे दि. १५ जून रोजी सुरू होणार्‍या महिन्यालाही नियमाप्रमाणे ‘ज्येष्ठ’ हेच नाव द्यावे लागेल. म्हणजे दोन ज्येष्ठ महिने झाले. पहिला ‘अधिक ज्येष्ठ’ आणि नंतरचा ‘निज ज्येष्ठ.’ त्या महिन्यात येणारे सण, धर्मिक गोष्टी इत्यादी ‘अधिक’ महिन्यात न करता, ‘निज’ महिन्यात करावेत, असा संकेत आहे. ‘अधिक महिना’ अगोदर आणि ‘निज महिना’ नंतर घेतल्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. या योजनेमुळे सण एका विशिष्ट कालावधीतच मागे-पुढे होतो आणि त्यांचा ऋतूंशी मेळ राहतो.
 
यावर्षी ‘अधिक महिना’ ‘ज्येष्ठ’ आहे. पुन्हा ‘ज्येष्ठ महिना’ कधी ‘अधिक’ असेल, याचा नियम जाणून घेऊया. एखादा विशिष्ट महिनाच पुन्हा ‘अधिक’ होण्यासाठी आठ, ११ किंवा १९ वर्षे जावी लागतात. यामुळे २०३७ साली पुन्हा ‘ज्येष्ठ महिना’च ‘अधिक’ येईल. ‘अधिक मासा’त केल्या जाणार्‍या व्रत-वैकल्य, दान-धर्माप्रमाणेच त्या मागचं खगोलविज्ञान समजून घेणंही महत्त्वाचं आहे.
 
अर्चित गोखले
(लेखक खगोल अभ्यासक आहेत.)