"मुस्लीम असून असे तृतीयपंथीयासारखे का राहतोस,” असे लोर नाराठीवतला समाजमाध्यमांवर प्रिजने विचारले. तृतीयपंथीयांचे समर्थन केले, अशाप्रकारचे ‘कुराण’ची ‘आयत’ त्याने म्हटली आणि बोलता-बोलता कुत्र्याचासुद्धा उल्लेख केला. पण, लोरने ‘आयत’चा अर्थ, स्वतःच्या मनाप्रमाणे तोडून-मोडून सांगितला आणि वर कुत्र्याचे नावही घेतले म्हणून मुस्लीम जमाव चिडला. त्यांनी लोरला माफी मागायला, स्वतःच्या थोबाडीत मारायला सांगितले. त्या जमावाने हिंसक पद्धतीने लोरचे मुंडण केले. का? तर, लोरने ईशनिंदा केली, ‘कुराण-आयत’चा अर्थ वेगळा सांगितला म्हणून. हे कुठे घडले? तर हे घडले, बौद्धधर्मीय देश थायलंडमध्ये!
लोर आणि प्रिजचे जे बोलणे सुरू होते, ते समाजमाध्यमांवर ‘लाईव्ह’ होते. त्यामुळे ते सर्वांनी ऐकले आणि पाहिले. तृतीयपंथी लोर ‘कुराण’ आणि ‘आयत’बद्दल बोलतो, स्वतःच्या तृतीयपंथीपणाचे समर्थन करतो, हे अनेकांना पटले नाही. त्यातच लोर याने ‘आयत’चा संदर्भ चुकीचा दिला, असे मुस्लीम समुदायाचे म्हणणे, तर, लोरला ज्ञान देण्यासाठी आणि समजावण्यासाठी बँकॉकच्या यमीलूल मशिदीच्या अध्यक्षाने बोलावले होते. लोर त्या अध्यक्षाला भेटायला गेला. त्यांची चर्चा सुरू होती. मात्र, कट्टरपंथी समुदायाने लोरला घेरले आणि त्याचे मुंडण केले. लोरने ईशनिंदा केली होती, असे त्यांचे म्हणणे. ईशनिंदा म्हणजे मुस्लिमांच्या श्रद्धांसंदर्भात निंदा, टीका करणे किंवा अपमानास्पद वर्तन करणे आणि त्याला इस्लामिक देशात एकच सजा - ‘सर तन से जुदा.’ पण, थायलंड हा इस्लामिक देश नसल्याने आणि तिथे ९५ टक्के बौद्धधर्मीय राहत असल्याने ‘सर तन से जुदा’ करण्याऐवजी लोरचे ‘बाल सर से जुदा’ केले, असेच म्हणावे लागेल. पण, लोरसाठी जबरदस्तीने मुंडण करणे, हे मृत्यूसारखेच असेल.
कारण, तृतीयपंथीयांचे आयुष्य आणि मानसिकता ज्यांनी जवळून पाहिली आहे, ते समजू शकतात की, जन्म पुरुष लिंग धारण करून झाला. मात्र, मन स्त्रीरूपी आहे. अशा वेळी पुरुष देहाच्या व्यक्तीला स्त्री म्हणून जगण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागतो. स्त्रियांसारखी केशभूषा करावी, असे त्यांना सारखे वाटते. त्यासाठी जीवाच्या आकांताने अगदी मूल वाढवावे, तसे ते केससंभार वाढवतात. का? तर, इतरांनी स्त्री म्हणून स्वीकार करावा म्हणून! लोरच्या बाबतीतही वेगळे काहीच नसेल. हिंसक धर्मांधांनी तिचे मुंडण करून तिचे केसच कापले नाहीत, तर तिच्या मनातल्या स्त्रीत्वाच्या जाणिवेला चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. छे! जावे त्यांच्या वंशा... तर, लोरच्या प्रकरणातून बदलते थायलंड जगासमोर आले. बुद्धाच्या शांती-करुणेचा देश म्हणून थायलंड परिचित. तसेच इथे प्रभू श्रीरामचंद्रांचे पवित्र स्मरण आजही आहे. राजाला इथे ‘राम’ म्हटले जाते. राजा म्हटले की, तो रामासारखाच असावा म्हणून!
अशा थायलंडमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. पाच टक्के असलेल्या मुस्लीम लोकसंख्येने त्यांची कट्टरता जपली आहे. त्यामुळेच तर थायलंडच्या सीमाभागात पट्टण परिसरात ते एकवटले आणि त्यांनी थायलंडपासून वेगळे होण्यासाठीचे उपद्व्याप सुरू केले. देशातील ९५ टक्के बौद्धधर्मियांपेक्षा आमची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे व्हायचे, असे त्यांचे म्हणणे. त्यासाठी ते हिंसा करतात, दंगल, बॉम्बस्फोट घडवतात, लोकांमध्ये दहशत माजवतात आणि हे सगळे करून वर अल्पसंख्याक आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होतो, हे सांगायलाही ते पुढे असतात. (भारतीयांसाठी हे नवे नाही!)
थायलंडचा पट्टण हा सीमाभाग मुस्लीमबहुल. तिथे बौद्धधर्मीय अल्पसंख्याक. त्यामुळे तिथले लोकजीवन कसे असेल, याचा अंदाज येऊच शकतो. याच परिसरात मागे ३०० बौद्धधर्मियांनी इस्लाम स्वीकारला. या सगळ्यामुळे थायलंड जागा होत आहे. थायलंड प्रशासन या सगळ्याकडे निधर्मी किंवा पुरोगामित्वाच्या नावावर नेभळट भूमिका घेत नाही. तिथले सैन्य आणि प्रशासन या सगळ्याच धर्मांधतेचा यथायोग्य समाचार घेत असते. श्रीलंका किंवा म्यानमारमध्ये काय झाले? याबद्दल थायलंडचे नागरिक जागरूक आहेत. आज लोरसोबत ईशनिंदेच्या कारणाने हिंसा झाली, उद्या आपल्यासोबतही हेच घडू शकते, यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे लोरच्या समर्थनार्थ थायलंडमध्ये वादळ उठले आहे.
९५९४९६९६३८