रोहितदादांचा वटहुकूम

    15-May-2026   
Total Views |
Rohit Pawar Statement
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे पुतणे रोहित पवार यांची वेगळीच धडपड सुरू आहे. अजितदादांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आजकाल काय करावे, काय करू नये, कुठे जावे, कुठे जाऊ नये इथपासून तर, कुणाच्या बाजूला बसावे आणि कुणाच्या नको; इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे कराव्यात, अशी रोहित पवारांची भाबडी अपेक्षा! याच धडपडीत ते कधीकधी विनंती करण्याच्या नादात आपला वटहुकूमही जारी करतात. या सगळ्यात सुनेत्रा पवार या केवळ आपल्या काकी नसून, एका मोठ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, याचा रोहित पवारांना विसर पडलेला दिसतो.
 
अलीकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आले, तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील इतर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. यातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांच्या शेजारी बसल्या होत्या. पण, ही गोष्ट रोहित पवारांना रुचली नाही. त्यांनी लगेच ‘पोस्ट’ केली आणि अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा काढत प्रश्न उपस्थित केला. अजितदादांच्या अपघाताशी संबंधित ‘व्हीएसआर’ कंपनीसोबत नागरी उड्डाणमंत्र्यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत असतानाही, सुनेत्राकाकींना त्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा जाणीवपूर्वक तर करण्यात आला नाही ना? असा बाळबोध प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाही, तर यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही जबाबदार धरले आणि वर सुनेत्राकाकींच्या स्टाफने यासंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही दिला. मुळात, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कुठे, कुणाच्या बाजूला बसावे हे सांगण्याचा अधिकार एका आमदाराला आहे का? बरे, रोहित पवार सुनेत्रा पवारांचे पुतणे असले, तरी आता दोघांचेही पक्ष वेगळे आहेत, याचा त्यांना विसर पडला का? शिवाय, अजितदादा गेल्यानंतर रोहित पवारांना स्वत:च्या पक्षापेक्षा त्यांच्याच पक्षाची काळजी अधिक. याच काळजीतून ते वेळोवेळी सुनेत्रा पवार यांना आपले अमूल्य सल्ले देत असतात. मात्र, या ‘अति’काळजीपोटी स्वत:च्या पक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणजे मिळवले!
 
बोले तैसा चाले...
 
पश्चिम आशियाई देशांमध्ये उद्भवलेल्या गंभीर संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काही आवाहने केलीत. त्यात इंधन बचत, स्वदेशी वस्तूंचा वापर, नैसर्गिक शेती, ऑनलाईन बैठका यांचा समावेश आहे. राज्य सरकारनेही पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत तशी पावले उचलण्यास सुरुवात केली. यासाठी शासनाच्या वतीने काही उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
 
परदेश दौर्‍यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापर वाढविणे, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, वाहनांच्या वापरात कपात, असे या उपाययोजनांचे स्वरूप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपाययोजना नुसत्या जाहीर करून थांबले नाहीत, तर स्वत: त्याची अंमलबजावणीही केली. नुकत्याच पार पडलेल्या नवनिर्वाचित विधान परिषद आमदारांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान याचे प्रकर्षाने दर्शन घडले.
 
या शपथविधी सोहळ्याला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून प्रवास करत ‘वर्षा’ बंगल्यावरून विधानभवन गाठले. यावेळी त्यांच्यामागे मंत्री आशिष शेलार बसले होते. दोघांच्या एन्ट्रीने उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांनी इलेट्रिक कारमधून प्रवास केला. दुसरीकडे, मंत्री नितेश राणे हे आपल्या बंगल्यापासून मंत्रालयात पायी चालत आले, तर अन्य काही मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहने कमी करत, ते एक ते दोन गाड्या घेऊन मंत्रालयात हजेरी लावली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महायुती सरकार हे केवळ बोलून नाही, तर करून दाखवणारे आहेत, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध आले.
 
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर विरोधकांनी सरकारवर नेहमीप्रमाणे टीकेची झोड उठवली. मात्र, त्याऐवजी राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या आवाहनाची अंमलबजावणी केल्यास ते देशहिताचेच ठरेल. पण, कुठल्याही गोष्टीला विरोध करणार नाहीत, ते विरोधक कसले? परंतु, सध्या देशभरात उद्भवलेली परिस्थिती पाहता, ही वेळ कुठल्याही गोष्टीला विरोध करण्याची नसून जनतेच्या हिताचा विचार करण्याची आहे. त्यामुळे या परिस्थितीत राजकारण न करता, विरोधकांनी देशहिताचा विचार करणे जास्त गरजेचे!




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....