पंतप्रधानांच्या यूएई दौर्‍यातून देशाची इंधन सुरक्षा निश्चित; संरक्षण, पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रांतही महत्त्वपूर्ण करार

    15-May-2026
Total Views |
PM Modi UAE Visit
 
दुबई : (PM Modi UAE Visit) अमेरिका आणि इराण संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई दौर्‍यावर शुक्रवारी इंधन सुरक्षेचा करार केला. या करारानुसार, यूएई भारताला एलपीजी गॅसचा पुरवठा करणार आहे.
 
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौर्‍यावर असून, त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी शुक्रवारी यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान यूएईने एलपीजी गॅस पुरवठा आणि धोरणात्मक इंधनसाठ्याविषयीच्या भारताबरोबरच्या कराराला मूर्तरुप दिले आहे.
 
 
 
धोरणात्मक इंधनसाठ्याविषयी भारताशी करार करणारा यूएई हा पहिलाच देश ठरला आहे. यूएईबरोबरच्या या करारामुळे इंधनप्रश्नामुळे निर्माण झालेला भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण हलका होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे अन्य चार मोठे करारही पंतप्रधान मोदी यांनी यूएई दौर्‍यात केले असून, त्यात उभय पक्षातील संरक्षण भागीदारीच्या आराखड्याचा करार, वडिनार येथे जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापनेबाबतचा करार, पायाभूत सुविधा विकासासाठी ‘आरबीएल बँक’ आणि ‘सन्मान कॅपिटल’मध्ये पाच अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीचीही घोषणा करण्यात आली.(PM Modi UAE Visit)
 
 
 
 
यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध प्रारंभीपासूनच मधुर राहिले असून, यूएईचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘ऑर्डर ऑफ झायेद’ने शेख मोहम्मद यांनी पंतप्रधान मोदी यांचा गौरव केला होता. त्यामुळेच आज यूएईच्या हवाई सीमांमध्ये पंतप्रधान मोदींचे विमान प्रवेश करताच, त्यांना यूएई हवाई दलाच्या ‘एफ-16’ विमानांनी ‘गार्ड ऑफ ओनर’ही दिला.
 
 
 
तसेच, भारताचे यूएईबरोबरचे व्यावसायिक संबंधही उत्तम राहिले असून, अनेक धोरणात्मक स्थितीमध्ये यूएईने भारताला सहकार्य केले आहे. होमुर्झ संकट तीव्र होत असतानाच, गेल्या वर्षी यूएई भारताचा चौथा मोठा इंधन पुरवठादार राहिला आहे. भारताने जवळपास 11 टक्के कच्च्या तेलाची आयात यूएईकडून केली होती. त्याचवेळी भारतातील तेलशुद्धीकरण कंपन्यांची सर्वाधिक निर्यात यूएईमध्येच होत असून, यूएईच्या अपस्ट्रीम क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी सुमारे 1.2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची गुंतवणूक केली आहे. अलीकडेच यूएई ‘ओपेक’मधून बाहेर पडल्याने, त्याच्यावरील ‘ओपेक’चे निर्बंध कमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात यूएई आणि भारतात स्थानिक चलनातील इंधन खरेदीसारखे अधिक धोरणात्मक करार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.(PM Modi UAE Visit)
 
इंधन सुरक्षेसाठी भारताने मांडला बुद्धीबळाचा पट
 
 
 
भारतात होत असलेल्या ‘ब्रिक्स’ देशांच्या शिखर परिषदेसाठी सदस्य देशांचे मंत्री उपस्थित असून, यामध्ये इराण, रशिया आणि यूएईच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. भारतानेही या परिषदेच्या माध्यमातून बुद्धिबळाचा पट मांडत इंधन सुरक्षा निश्चित करण्यावर भर दिला. रशियाने भारताला आश्वस्त करताना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला इंधन पुरवठा खंडित करणार नसल्याचे म्हटले आहे.(PM Modi UAE Visit)