२० वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय ;नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

येत्या ६ महिन्यात नवी मुंबईतील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार

Total Views |
 Navi Mumbai Railway
 
मुंबई : (Navi Mumbai Railway) नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या बैठकीत सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके पुढील ६ महिन्यांत रेल्वेकडे हस्तांतरित करणे, पावसाळापूर्व कामे आणि दैनंदिन देखभाल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
 
खासदार म्हणून नरेश म्हस्के यांनी पदभार स्वीकारल्यापासून नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत प्रवाशांच्या सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्यांची दखल घेत ‘रेल्वे सल्लागार समिती' चे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकांमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय मांडला.
 
वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८ मध्ये संपले आहेत. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नाही. तर धक्कादायक बाब म्हणजे ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नाही. या गोष्टी खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले. (Navi Mumbai Railway)
 
 
रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या मागण्या व सूचना यांनुसार स्थानके हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया येत्या ६ महिन्यात पूर्ण करण्याचे मान्य केले. तसेच पावसाळापूर्व सर्व कामे आणि दैनंदिन कामे मध्ये रेल्वे प्रशासन करेल असे लेखी पात्र येत्या आठवड्यात देण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपण केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रवाशांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार मानले आहेत. (Navi Mumbai Railway)
 
बैठकीला सिडकोच्या वतीने जीएमडी डॉ. राजा दयानिधी आणि इतर अधिकारी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर रजनीश माथूर, चीफ इंजिनिअर नवीन पाटील आदी अधिकारी, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेवक अनिकेत म्हात्रे, भावेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव, दिनेश जाधव आणि शिवसैनिक उपस्थितीत होते. (Navi Mumbai Railway)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.