कोची-लक्षद्वीप दरम्यान सी-प्लेनची यशस्वी चाचणी; लक्षद्वीपच्या निळ्याशार पाण्यावर प्रथमच जलविमानाचे ऐतिहासिक लँडिंग

Total Views |
 Lakshadweep Tourism Development
 
कोची : (Lakshadweep Tourism Development) भारतातील बेटसमूहांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या हवाई वाहतुकीत नवा इतिहास रचत बुधवार, दि.१३ रोजी कोची ते लक्षद्वीप दरम्यान सी-प्लेनची यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण करण्यात आली. लक्षद्वीपच्या शांत, नितळ पाण्यावर प्रथमच जलविमान उतरल्याने बेटांमधील दळणवळण आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हि चाचणी यशस्वी झाल्याची माहिती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिली आहे.
 
स्कायहॉप कंपनीकडून संचलित करण्यात आलेल्या DHC6-400 ट्विन ऑटर (VT-SHE) या सी-प्लेनने प्रथम अगत्ती बेटावर सुरक्षित लँडिंग केले. त्यानंतर हे विमान कवरत्ती बेटाकडे रवाना झाले. या चाचणी उड्डाणादरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालय तसेच संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा, तांत्रिक क्षमता आणि कार्यप्रणालीची पाहणी केली.
 
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, अगत्ती वॉटरड्रोम येथे सी-प्लेनचे यशस्वी चाचणी लँडिंग करण्यात आले. या यशस्वी चाचणीमुळे लक्षद्वीपमध्ये सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. प्रस्तावित सी-प्लेन सेवा कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला कल्पेनी, कदमत, किल्तान, कवरत्ती आणि अगत्ती या बेटांशी जोडणार आहे.
 
हेही वाचा :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत उद्या साताऱ्यात ५ लाख घरांचे लोकार्पण
 
प्रत्येक उड्डाणात सुमारे ९ ते १० प्रवाशांची क्षमता असणार असून, ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे बेटांमधील संपर्क अधिक सुलभ होणार असून लक्षद्वीपमधील पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. (Lakshadweep Tourism Development)
 
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी डीजीसीए, लक्षद्वीप प्रशासन, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. कवरत्ती येथे या चाचणी मोहिमेचे स्वागत लक्षद्वीप प्रशासकांचे सल्लागार एस. बी. दीपक कुमार आणि बंदरे विभागाचे संचालक गिरी शंकर यांनी केले. सुरक्षा व्यवस्थेसाठी लक्षद्वीपच्या पोर्ट्स, शिपिंग आणि एव्हिएशन विभागाने विशेष सहकार्य केले. (Lakshadweep Tourism Development)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.