मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातील भोपाल येथे एका हॉटेलमध्ये हिंदू तरुणीसोबत आढळलेल्या मुस्लिम युवक आरिफ खानला मारहाण करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी इस्लामी जमाव रस्त्यावर उतरला आणि ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत आंदोलन केले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांसह रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. ही घटना गोविंदपुरा परिसरातील असून सध्या पीरगेट, शाहजहानाबाद आणि आसपासच्या भागांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदू तरुणीसोबत असलेल्या मुस्लिम युवकाला पकडले होते. कार्यकर्त्यांनी त्या युवकाला बेदम मारहाण केली. हिंदू संघटनांनी संबंधित युवकावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप केला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या इस्लामी कट्टरपंथीयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दुपारी ताजुल मशिदीबाहेर मोठा जमाव जमला. त्यानंतर रात्रीपर्यंत विविध भागांत आंदोलन सुरू राहिले. या वेळी जमावाकडून ‘सर तन से जुदा’, ‘अल्लाह-हु-अकबर’ आणि ‘ला इलाहा इल्लल्लाह’ अशा घोषणा देण्यात आल्या.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलकांविरोधात तलैया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओंच्या आधारे संबंधितांची ओळख पटवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.