हडपसर बॉम्बप्रकरणी नागपूर रेल्वे स्टेशनवर तरुणाला अटक , एटीएसची कारवाई

    15-May-2026
Total Views |
Hadapsar Bomb Case
 
पुणे : (Hadapsar Bomb Case) पुण्यात हडपसर परिसरातील खासगी रुग्णालयात सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने नागपूर रेल्वे स्टेशनवर एका तरुणाला अटक केली आहे. शिवाजी राठोड असं या संशयित आरोपीचं नाव असून तो पुण्यातील मांजरी परिसरातील रहिवासी आहे.
 
बुधवारी संध्याकाळी ही घटना समोर आल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्यानंतर एटीएस आणि इतर तपास यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत त्याचा शोध घेतला. आरोपी शिवाजी राठोड हा आझाद हिंद एक्सप्रेसनं प्रवास करत होता. ही रेल्वे नागपूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आली, आरोपी गाडीतून उतरत असताना एटीएसनं त्याला चारही बाजूंनी घेरलं आणि ताब्यात घेतलं. नागपूर एटीएसकडे आरोपीनं गुन्हाची कबुली दिल्याचीही माहिती आहे.
 
संशयित आरोपीच्या दुकानात सापडले पुरावे
 
संशयित आरोपीच्या दुकानाची झडती घेतली असता, आयईडीमध्ये वापरण्यात आलेल्या टायमरप्रमाणेच एक रिकामा टायमर बॉक्स जप्त करण्यात आला.एटीएसच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आयईडीमध्ये वापरलेल्या टायमरशी मिळताजुळता रिकामा बॉक्स संशयिताच्या दुकानातून सापडला आहे. त्याची सध्या चौकशी सुरू असून या कटात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.” (Hadapsar Bomb Case)
 
हेही वाचा :  महाराष्ट्रातील मतदार याद्यांचं होणार विशेष सखोल पुनरिक्षण, निवडणूक आयोगाकडून SIRच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा
 
आणखी कुणाचा सहभाग होता का?
 
बुधवारी संध्याकाळी हडपसरमधील उषा किरण रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं. पथकाने संशयास्पद वस्तूची तपासणी करून ती सुरक्षितरीत्या निकामी केली. प्राथमिक तपासात ही कमी तीव्रतेची आयईडी असल्याचं निष्पन्न झालं असून त्यात टायमर यंत्रणा बसवण्यात आली होती. या घटनेमागचा हेतू काय होता, तसेच हा एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता का, याचा तपास सुरू आहे. संशयिताचे इतर संपर्क, त्याने साहित्य कुठून मिळवलं याचा सखोल तपास करण्यात येतोय. (Hadapsar Bomb Case)