दिल्ली-पडघा इसिस मॉड्यूलची ईडी पाळमुळं शोधणार;१९ आरोपींच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी
15-May-2026
Total Views |
मुंबई : (ED investigation ISIS case) देशभरात विविध तुरुंगांमध्ये बंद असलेल्या दिल्ली-पडघा इसिस मॉड्यूलशी संबंधित १९ आरोपींची चौकशी करण्यास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला विशेष पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली आहे. दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणी, मनी लॉन्डरींग आणि कट्टरतावादी जाळं उभारल्याच्या आरोपांच्या तपासासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. यातील काही आरोपींचा संबंध सिमी या प्रतिबंधित संघटनेशी आहे, तर काही आरोपी हे पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आलाय.
ही कारवाई राष्ट्रीय तपास संस्थेनं २०२३ साली उघड केलेल्या दिल्ली-पडघा इसिस मॉड्यूल प्रकरणाशी संबंधित आहे. या आरोपींनी देशात इसिसचं जाळं विस्तारण्यासाठी कट रचला होता. यासाठी निधी उभारणी आणि प्रशिक्षण शिबिरं आयोजित करण्यात आल्याचे आरोप आहेत. ईडीला चौकशीसाठी तिहार जेल, मुंबईतील आर्थर रोड जेल आणि लखनौतील सेंट्र्ल जेलसह विविध तुरुंगांना भेटी देण्याची परवानगी देण्यात आलीय.
महाराष्ट्रातील पडघा इसिस मॉड्यूल पुन्हा चर्चेत आलं आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पडघा परिसरात इसिस प्रेरित जाळं सक्रिय करण्यात आलं होतं. या नेटवर्कद्वारे युवकांना कट्टरतावादी विचारसरणीकडे वळवणे, शस्त्र आणि आयईडी बॉम्ब निर्मितीचं प्रशिक्षण देणे, तसेच देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. ईडीने विशेष न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलच्या माध्यमातून निधी जमा करून तो दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयितांनी विविध माध्यमांतून पैसे गोळा करून त्याचा वापर प्रशिक्षण शिबिरं, लॉजिस्टिक व्यवस्था आणि कट्टरतावादी प्रचारासाठी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी आरोपींची चौकशी आवश्यक असल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं. (ED Investigation ISIS Case)
या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी साकीब नाचन याचं नाव पुन्हा समोर आलं आहे. तपास यंत्रणेनुसार, नाचन हा भारतातील इसिसचा स्वयंघोषित “अमीर-ए-हिंद” म्हणून काम करत होता. युवकांची भरती, दहशतवादी प्रशिक्षण आणि संघटनात्मक जाळं मजबूत करण्यामध्ये त्याची प्रमुख भूमिका असल्याचा दावा तपास संस्थांनी केला आहे. नाचनचा मृत्यू झाल्यानंतरही त्याने तयार केलेलं नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इसिसशी संबंधित आर्थिक स्रोत उघड होणार
ईडीच्या चौकशीतून आर्थिक व्यवहार, निधीचे स्रोत, डिजिटल पुरावे आणि परदेशी संपर्क याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दोन्ही केंद्रीय यंत्रणा समन्वयाने या प्रकरणाचा तपास करत असून, देशात इसिस संबंधित नेटवर्क पुन्हा सक्रिय होऊ नये यासाठी तपास अधिक व्यापक केला जात आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील पडघा परिसरात काही वर्षांपूर्वी उघड झालेल्या दहशतवादी मॉड्यूलची गंभीरता पुन्हा अधोरेखित झाली आहे. (ED Investigation ISIS Case)