मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. काही महिन्यापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मानसिक आजार आणि मानसोपचारावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. एकूण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात एमडी पदवी संपादन केली. गेली तीन दशके ते मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी मानसिक आजारांकडे केवळ वैद्यकीय दृष्टीकोनातून नव्हे, तर मानवी भावविश्व समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांच्या उपचारपद्धतीला संवेदनशीलतेची जोड लाभली होती.
त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी काही व्यावसायिक नाटकं देखील लिहिली आहेत. दि. २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना झाली.