मुंबई : (BMC Mumbai) मुंबई महानगरातील वृक्षांवर वाढत्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम होऊ नये, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी न मिळाल्यास ती कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेत झाडांना पाणी पुरवून संजीवनी देण्यासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. पिण्यासाठी अयोग्य असलेले, परंतू, झाडांसाठी पोषक असलेले पाणी यासाठी वापरण्यात येत आहे. (BMC Mumbai)
सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर, खासगी क्षेत्रातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पाणीपुरवठा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याच्या टँकरद्वारे झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
जी दक्षिण विभागात केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ व जुहू परिसरात स्वच्छता अभियानासोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. उद्यान विभागाकडूनही मुंबईतील विविध भागांत झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे तसेच झाडांच्या आरोग्याची पाहणी करण्याची कामे सातत्याने सुरू आहेत. (BMC Mumbai)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....