डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी संयुक्तपणे स्थळ पाहणी करावी - अश्विनी भिडे

    15-May-2026   
Total Views |

mumbai tarun bharast

मुंबई,(Ashwini Bhide) :
प्रतिनिधीडास प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कीटक नियंत्रण विभागाच्या चमुला स्थळ भेटींदरम्यान प्रवेश मिळवून देण्यासाठी मुंबईतील विविध यंत्रणांनी सहकार्य करावे. कीटक नियंत्रण विभागाला आवश्यक सहकार्य करत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. तसेच महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेल्या पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून रुग्णसंख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
 
अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त शरद उघडे यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते. (Ashwini Bhide)
आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, "जीर्ण झालेल्या इमारती, गवत वाढलेली ठिकाणे, गिरण्यांचे भूखंड, विविध यंत्रणांचे प्रतिबंधात्मक क्षेत्र अशा ठिकाणी कीटक नियंत्रण विभागाच्या चमूला पोहचण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यात यावेत. याठिकाणी संयुक्तपणे प्रयत्न करत डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळी आजारांमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २१ यंत्रणांच्या आस्थापना परिसरात ६,१६० पाण्याच्या टाक्यांसाठी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कीटकनाशक विभाग आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत डास उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत."(Ashwini Bhide)
 
५ हजारांहून अधिक मनुष्यबळाला प्रशिक्षण पूर्ण
 
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात इमारत पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. बांधकाम प्रकल्पस्थळी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठीचे प्रशिक्षण सुरक्षा अधिकारी तसेच कामगार वर्गाला देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५ हजाराहून अधिक मनुष्यबळाला डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच संवाद व समन्वयासाठी सुरक्षा अधिकारी आणि कीटक नियंत्रण विभाग यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
पावसाळापूर्ण उपाययोजनांचा भाग म्हणून कीटक नियंत्रण विभागाच्या चमुने फेब्रुवारी महिन्यापासूनच विविध आस्थापनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीद्वारे पाण्याच्या टाक्यांवर लावण्यात आलेल्या झाकणांची तपासणी करण्याची मोहीम राबविली आहे. तसेच अडगळीतील वस्तू, साहित्य निष्कासन कार्यवाही पूर्ण झालेली नाही, असे आढळून आले आहे. काही ठिकाणी अभियांत्रिकी पद्धतीच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. स्थळ भेटीच्या मोहिमेच्या माध्यमातून विविध शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांना पावसाळ्याआधीच डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.(Ashwini Bhide)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....