घरापासून समाजापर्यंत सतत नाकारले जाण्याचा अनुभव घेतलेल्या अर्पिता भिसे आज तृतीयपंथी समाजाला शिक्षण, सन्मान आणि मुख्य प्रवाहातील स्थान मिळवून देण्यासाठी संघर्षरत आहे. त्यांचा जीवनप्रवास...
छत्रपती संभाजीनगरमधील एका सर्वसाधारण कुटुंबात वाढलेल्या अर्पिता मुरलीधर भिसे यांचा प्रवास हा केवळ एका तृतीयपंथी व्यक्तीचा वैयक्तिक संघर्ष नाही, तर समाजाने चौकटीबाहेर ढकललेल्या अस्तित्वाने स्वतःसाठी जागा निर्माण करण्याचा प्रवास आहे. आज अर्पिता तृतीयपंथी हक्क, शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनासाठी काम करणार्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र, या ओळखीमागे अनेक वर्षांचा अपमान, उपेक्षा आणि स्वतःला स्वीकारण्यासाठीची कठीण लढाई दडलेली आहे. अर्पिता सांगतात की, "तृतीयपंथी व्यक्तींचा संघर्ष हा एका प्रसंगापुरता मर्यादित नसतो; तो रोज जगावा लागतो.” लहानपणापासूनच त्यांना मुलींसारखे राहण्याची ओढ होती. साडी नेसावी, स्त्रीसदृश वागावे, असे मन सांगत होते; पण समाज आणि कुटुंबाच्या चौकटी वेगळ्याच होत्या. त्यामुळे स्वतःलाच सतत लपवून ठेवण्याची वेळ येत होती.
शाळेत चेष्टा, घरात प्रश्न आणि समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाणे, या सगळ्यातच त्यांचे बालपण गेले. ‘आपण नेमके कोण आहोत?’ हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करत होता. अशाच एका टप्प्यावर त्यांचा तृतीयपंथी समुदायाशी संपर्क आला आणि पहिल्यांदाच त्यांना स्वतःसारखी माणसे भेटली. तिथे त्यांना स्वतःची ओळख सापडली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा निर्णय घेतला आणि साडी नेसून उघडपणे आयुष्य जगायला सुरुवात केली. पण, ‘स्वतःला स्वीकारणे’ आणि ‘समाजाने स्वीकारणे’ यात खूप अंतर असते. प्रारंभीच्या काळात पुण्यात वास्तव्यास असताना उदरनिर्वाहासाठी अर्पिता यांना भिक्षुकी करावी लागली. त्याकाळात घरच्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, सत्य समोर आल्यानंतर नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्या दिवसानंतर पुन्हा घराकडे गेले नसल्याचे त्या सांगतात.
आजही घर भाड्याने घ्यायचे म्हटले की, संघर्ष करावा लागतो. तृतीयपंथी आहोत हे समजले की, लोक बोलण्याची पद्धत बदलतात. काहीजण थेट नकार देतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, प्रवास करताना किंवा सरकारी कार्यालयात कामासाठी गेल्यावरही अनेकदा अपमानास्पद अनुभवांना सामोरे जावे लागते. मात्र, या अनुभवांनी अर्पिता कठोर झाल्या नाहीत. उलट, त्यांनी स्ववेदनेला समाजासाठी काम करण्याची दिशा दिली. तृतीयपंथी व्यक्तींना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अर्पिता यांचे विशेष काम म्हणजे तृतीयपंथी समुदाय आणि शासन यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याचे. समाजातील अनेक तृतीयपंथी व्यक्तींना सरकारी योजना, कागदपत्रांची प्रक्रिया किंवा शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती नसते. ‘किन्नर विकास परिषदे’च्या माध्यमातून आणि शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून त्या तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, तृतीयपंथी व्यक्तींना दयेची नाही, तर संधीची गरज आहे. काम द्यायचे नाही, शिक्षणात टिकू द्यायचे नाही आणि नंतर आम्ही भिक्षुकी किंवा देहविक्री का करतो, असा प्रश्न विचारायचा, असे त्या स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे समुदायातील व्यक्तींनी शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि सन्मानाने जगावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अर्पिता यांचे काम केवळ बैठका किंवा आंदोलनांपुरते मर्यादित नाही, तर त्या थेट समुदायामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. तृतीयपंथी आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनांतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या प्रवासात त्यांना काही माणसे आधार देणारी भेटली. त्यांच्या गुरू राधिका साठे यांनी त्यांना स्वतःच्या ओळखीने जगण्याचे धैर्य दिले. रेशमा इतके यांनी त्यांचे थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यास, आर्थिक गरज किंवा सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना लागणारा आत्मविश्वास प्रत्येक टप्प्यावर त्या पाठीशी उभ्या राहिल्या.
आज अर्पिता कायद्याचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे स्वप्न आहे, उत्तम वकील बनून तृतीयपंथी समाजासाठी कायदेशीर पातळीवर लढणे. ‘महाराष्ट्र ट्रान्सजेंडर हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळा’च्या कार्यकारिणी सदस्य, तसेच ‘किन्नर विकास परिषदे’त देवगिरी प्रांताच्या सचिव म्हणून त्या कार्यरत आहेत. ‘कोथी सहेली फाऊंडेशन आणि ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या माध्यमातूनही त्या सातत्याने समाजकार्य करत आहेत.
अर्पिता भिसे यांचा प्रवास, संघर्षही कायम आहे. पण, त्या संघर्षानेच त्यांना घडवले आणि समाजासाठी उभे राहण्याचे बळ दिले. समाजाला तृतीयपंथीयांच्या टाळ्या ऐकू येतात. पण, त्या टाळ्यांमागचे आयुष्य, वेदना, अपमान आणि सन्मानाने जगण्यासाठीची धडपड समजून घेण्याची गरज अजूनही आहे. अर्पिता भिसे यांच्या संवेदनशील प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
९९६७०२०३६४