‘विजय’पर्वाला अननुभवाचे ग्रहण...

    14-May-2026   
Total Views |
Vijay Political Leadership Challenges
 
चित्रपटातील राजकीय नाट्यावर अवघ्या तीन तासांत पडदा पडतो. पण, वास्तवात राजकारण हे ‘प्रोफेशन’ नसून २४ तास आणि ३६५ दिवसांचे जनसेवेचे अखंड ‘पॅशन’ आहे. मात्र, तामिळनाडूतील विजय सरकारचे निकालापासून ते आजवरचे अवघ्या काही तासांतील निर्णय पाहता, ‘टीव्हीके’ सरकारवरील हे अननुभवाचे ग्रहण सर्वस्वी चिंताजनकच म्हणावे लागेल.
 
दि. ४ मे रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तामिळनाडूमध्ये अनपेक्षितपणे जोसेफ विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ अर्थात ‘टीव्हीके’ या अवघ्या अडीच वर्षांचे राजकीय संचित असलेल्या पक्षाला १०८ जागांवर घवघवीत यश मिळाले. मात्र, २३४ आमदारांच्या विधानसभेत आवश्यक ११८ हा बहुमताचा आकडा विजय यांना गाठता आला नाही. शेवटी काँग्रेससह ‘सीपीआय’, ‘सीपीआय-एम’, ‘व्हीसीके’, ‘आययूएमएल’ या पक्षांनी ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिला आणि विजय यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. पण, या संपूर्ण प्रक्रियेसाठी तब्बल चार वेळा ‘लोकभवना’च्या फेर्‍या विजय यांना माराव्या लागल्या. एकदा तर ते काँग्रेसच्या समर्थनाचे पत्र गाडीमध्येच चक्क विसरल्याचीही बातमी झळकली. त्यामुळे तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना ‘पॉलिटिक्स इज सीरियस बिझनेस’ असा वडीलकीचा सल्लाही विजय यांना प्रारंभीच द्यावा लागला. अखेरीस काल अण्णाद्रमुकच्या एस. पी. वेलुमणी गटातील २५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे ‘टीव्हीके’कडे १४४ आमदारांचे भक्कम पाठबळ सिद्ध झाले. याचाच अर्थ, काँग्रेस आणि डावे ‘टीव्हीके’ला त्यांच्या तालावर नाचवू शकणार नाही, याचीही अप्रत्यक्ष तजवीज अण्णाद्रमुकला सत्तेत सामील करून कुठेतरी केंद्रानेच घेतलेली दिसते. त्यामुळे विजय यांच्या बाळसे घेतलेल्या सरकारवरील राजकीय अस्थिरतेचा धोका तूर्तास टळला आहे. मात्र, तरीही विजय यांच्या सरकारवर अननुभवाचे ग्रहण मात्र कायम आहे.
 
जोसेफ विजय शरीरयष्टीने वाटत नसले, तरी त्यांचे वयवर्षे ५१! आता या ५१ वर्षांपैकी तब्बल ४० वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव हा तामिळ चित्रपटसृष्टीतला. १९८४ साली बालकलाकार म्हणून सुरू केलेली कारकीर्द ते आता जवळपास ६९ चित्रपटांतून विजयने तामिळ प्रेक्षकांच्या मनात गारुड निर्माण केले. ‘थलपती’ (अर्थात, सेनापती) अशी त्यांची तामिळनाडूमध्ये ‘लार्जर देन लाईफ’ प्रतिमा आणि त्याच प्रतिमेने त्यांची राजकारणातील विजयी वाट सुकर केली. तसा ‘रील लाईफ’ ते ‘रिअल लाईफ’ राजकारणाचा तामिळनाडूला जुनाच राजकीय वारसा. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन आणि नंतर जयललिता, या तीन दिग्गजांनी चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर मुख्यमंत्री म्हणूनही राज्याचे आपापल्यापरीने सक्षमपणे नेतृत्व केले. रजनीकांत, कमल हसन या तामिळ सुपरस्टार्सनेही आपले नशीब राजकारणात आजमावून बघितले खरे. पण, त्यात ते अयशस्वी ठरले. जोसेफ विजय मात्र त्याला अपवाद! २०२४ साली ‘टीव्हीके’ची स्थापना करून, आता २०२६ साली ते सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. पण, पद, प्रसिद्धी, पैशाचा हा आलेख जितक्या वेगाने वर उंचावतो तितक्याच तीव्रतेने कोसळायलाही फारसा वेळ लागत नाही, ही खूणगाठ विजय यांनी आताच बांधलेली बरी! कारण, खरेखुरे राजकारण हे सिनेमाप्रमाणे ‘स्क्रिप्ट’वर नव्हे, तर दिवसागणिक नवनवीन आव्हाने इथे राजकीय ‘स्किल’चीच कसून परीक्षा घेत असतात. ही आव्हाने सत्ता उपभोगणार्‍या करुणानिधी, एमजीआर आणि जयललिता यांच्या नेतृत्वालाही चुकली नाहीत. त्यामुळे या पूर्वसूरींच्या अनुभवातून, नेतृत्वशैलीतून धडा घेऊन विजय यांना स्वत:चे नाणे खणखणीत वाजणारे आहे, हे सिद्ध करावे लागेल.
 
विजय यांना शपथ घेऊन अवघे काही तास उलटत नाही, तोवर त्यांच्या एका निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हानही दिले गेले. हा निर्णय म्हणजे त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी राधान पंडित वेट्रिवेल यांची ‘ओएसडी’ (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’) म्हणून जाहीर केलेली नियुक्ती. खरेतर ‘ओएसडी’ हे अत्यंत जबाबदारीचे पद. या पदावर शक्यतो ‘आयएएस’ दर्जाचे अधिकारी, ज्येष्ठ सल्लागार किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या धोरणी व्यक्तीची निवड अपेक्षित असते. पण, विजय यांनी ज्योतिषालाच ‘ओएसडी’ म्हणून नेमल्याने टीकेची झोड उठली. मित्रपक्षांनी विजय यांच्या या निर्णयाला उघड विरोध केला. ‘सरकार विज्ञाननिष्ठतेवर विश्वास ठेवणारे हवे. अशाप्रकारे ज्योतिषाच्या निवडीने समाजात चुकीचा संदेश जाईल,’ म्हणून अखेरीस विजय यांनी काल या नियुक्तीला स्थगितीही दिली. मुळात जो मुख्यमंत्री ख्रिश्चन धर्म मानतो, वर स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून मिरवतो, अशा नेत्याला ज्योतिषाची गरजच काय, हा प्रश्न पडणे साहजिकच. त्यातच एकीकडे ज्योतिषाची नेमणूक करणारे विजय मात्र परवा उदयनिधीच्या विधानसभेतील ‘सनातन धर्माचे उच्चाटन करायला हवे’ या संतापजनक विधानावर मात्र मूग गिळून बसले. म्हणजे विजय यांना सनातनची ज्योतिष-परंपरा मान्य; पण त्याच सनातनचा जेव्हा उदयनिधीकडून विधानसभेच्या सभागृहात अपमान झाला, तेव्हा विजय तोंड शिवून का बसले होते? त्याचे कारण म्हणजे, सेक्युलरवादाचा विजय यांनी पांघरलेला बुरखा. शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणातच ‘आता सेक्युलॅरिझम आणि सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे,’ असे वक्तव्य विजय यांनी केले. पण, ज्योतिषाच्या निवडीवरून त्यांचे हेच ‘सेक्युलॅरिझम’ मित्रपक्षांनाही खुपले आणि त्यांच्या विरोधामुळे ‘ओएसडी’ नियुक्तीचा निर्णय त्यांना गपगुमान रद्द करावा लागला. त्यामुळे विजय यांच्या कारकिर्दीची सुरुवातच काहीशी अडखळत झालेली दिसते.
 
त्यातच विजय यांची विधानसभेतील एकूणच देहयष्टीही शपथविधीच्या दिवशीप्रमाणे आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली नव्हती. त्यांच्या चेहर्‍यावर चिंता, निराशा यांचे मळभ जणू दाटून आले होते. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, विजय यांनाही खरेतर इतका अभूतपूर्व विजय अपेक्षित नसावा. आपण अवघ्या काही जागा जिंकू आणि चित्रपटातील अभिनयही पुढे असाच सुरू राहील, असा त्यांचा कयास असावा. पण, आता त्यांना अभिनयाला पूर्णविराम देऊन, पूर्णवेळ मुख्यमंत्रिपदाची भूमिकाच निभवावी लागेल. जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही करावी लागेल. त्यामुळे हे स्थित्यंतरही वाटते तितके सोपे नक्कीच नाही.
 
राजकारणात नियम, कायदे, राजशिष्टाचाराचे पालन, सरकार, प्रशासन, पक्ष आणि जनता या चारही स्तरावर सुसंवाद विजय यांना प्रस्थापित करावा लागेल. शपथविधीदरम्यान आपणच सत्तेचे केंद्र असणार आहोत, हे विजय यांनी जाहीर केले खरे. परंतु, सत्तेचे किती पातळीवर केंद्रीकरण करायचे आणि कुठे विकेंद्रीकरण आवश्यक आहे, याचा सुवर्णमध्य विजय यांना साधावा लागेल. शिवाय विजयच पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीही; त्यामुळे पक्ष आणि सरकार या दोन्हीच्या कसोटीवर त्यांच्या नेतृत्वाचा कस निश्चितच लागू शकतो. करुणानिधी, एमजीआर, जयललिता यांची नेतृत्वशैली, कार्यशैली एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असली, तरीही द्रविडी राजकारणावर आपला दबदबा निर्माण करण्यात ते तिघेही कमालीचे यशस्वी ठरले. त्यामुळे सिनेमातील सुपरस्टार जोसेफ विजय आता राजकारणातही त्याच त्वेषाने चमकेल का, हे येणारा काळच ठरवेल!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची