मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमधील शुभेंदू अधिकारी सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य केले आहे. शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ गायचे असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याची माहिती आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर अनेक शाळा प्रमुख संभ्रमावस्थेत आहेत. कारण, मागील सरकारच्या कार्यकाळात शाळांच्या सकाळच्या सत्रांत राज्यगीत ‘बांग्लार माटी बांग्लार जल’ गाणे अनिवार्य करण्यात आले होते. आता नव्या आदेशात ‘वंदे मातरम्’चा समावेश झाल्यानंतर शाळांसमोर सकाळच्या सभेत नेमकी कोणती गीते ठेवायची, हा प्रश्न निर्माण झालाय. अनेक शाळा प्रमुखांचे म्हणणे आहे की, राष्ट्रगीत वगळणे शक्य नाही, कारण ते राष्ट्रीय स्तरावर अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीत या दोन्हींचा समावेश केल्यास प्रार्थना सभेचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे वर्ग सुरू होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, नव्या निर्देशांमध्ये केवळ ‘वंदे मातरम्’चा शालेय प्रार्थनेत समावेश करण्याबाबत उल्लेख आहे. राज्यगीताचा त्यात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय गीतांचा सन्मान राखणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांचा वेळ आणि शैक्षणिक उपक्रम यामध्ये समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.