मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक पदावर वनअपराध्याच्या झालेल्या नियुक्तीच्या चौकशीचे आदेश पुणे वनसंरक्षकांनी दिले आहेत (honorary wildlife warden). सोलापूरच्या जी.आय.बी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर पुणे वनसंरक्षकांनी हे पाऊल उचलल्याचे दिसते (honorary wildlife warden). नुकत्याच झालेल्या मानद वन्यजीव रक्षकाच्या नियुक्तीमध्ये सोलापूरसाठी नियुक्ती केलेल्या मानद वन्यजीव रक्षकावर वनअपराधाचे गुन्हे असल्याची तक्रार करण्यात आली आहे. (honorary wildlife warden)
सोलापूरच्या जी.आय.बी संस्थेचे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांनी सोलापूर जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षक पदी वनअपराध्याची झालेली नियुक्ती रद्द करण्याची विनंती वन विभागाला केली होती. सोलापूरसाठी नियुक्त केलेल्या मानद वन्यजीव रक्षकावर २०२२ साली वनगुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूरच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी एक मोर आणि दोन पोपट आढळून आले होते. चौकशीअंती हे पक्षी पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी मानद वन्यजीव रक्षकानेच ठेवल्याचे उघड झाले होते. त्यावेळी हे पक्षी देखभाल आणि उपचारासाठी आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी ठेवल्याची सबब मानद वन्यजीव रक्षकाने दिली होती. त्यामुळे वन विभागाने त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याची चौकशी २०२२ सालापासून सुरू आहे. मात्र, आता गुन्हा दाखल झालेल्या वनअपराध्याचीच नियुक्ती मानद वन्यजीव रक्षक पदी करण्यात आली आहे.
वनअपराध्याची ही नियुक्ती एका माजी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडून केल्याची माहिती सोलापूर वन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. यावर पंकज चिंदरकर यांनी वन विभागाकडे तक्रार दाखल करुन पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्याची विनंती केली. त्यावर पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सोलापूर वन विभागाला मानद वन्यजीव रक्षक पदी वनअपराध्याची झालेल्या नियुक्तीची चौकशी करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, "तक्रारीच्या अनुषंगाने नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही/चौकशी करुन वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल (केलेल्या कार्यवाहीसह) कार्यालयास सादर करावा."