॥सौंदर्यलहरी भाष्य भाग २४॥

    14-May-2026
Total Views |
Saundaryalahari Vagdevata Vachasiddhi
 
सवित्रीभिर्वाचां शशिमणि-शिला-भङ्ग-रुचिभि-
र्वशिन्यद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः|
स कर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभि-
र्वचोभिर्वाग्देवी-वदन-कमलामोद-मधुरैः॥१८॥
                                                         (भाग २)
 
मागील भागात आपण या श्लोकाचे पूर्वार्ध निरूपण वाचले होते. या भागात आपण उर्वरित निरूपण वाचणार आहोत. अष्ट वाग्देवी, त्यांचे प्रभुत्व असणारा वर्ण समूह आणि उच्चारस्थान यांची आपण माहिती घेत आहोत. मागील भागात आपण पहिल्या चार वाग्देवींचे स्वरूप जाणून घेतले होते. या भागात पुढील चार वाग्देवींचे स्वरूप आपण जाणून घेणार आहोत.
 
५. अरुणा
 
स्वरूप आणि अर्थ
अरुणा म्हणजे उषःकाळाची लालिमा, तांबडा रंग, प्रभातशक्ती. ती उगवत्या सूर्याच्या लालसर प्रकाशाचे प्रतीक आहे. नव्या चेतनेचा, नव्या ज्ञानाचा उदय. अरुणादेवी तवर्गाची-दंत्य वर्णांची-अधिष्ठात्री आहे.
अधिकृत वर्णसमूह - तवर्ग
तवर्ग (५) : त, थ, द, ध, न
उच्चारस्थान - दंत्य
तवर्गातील वर्ण दंत्य आहेत, म्हणजेच दातांपासून उच्चारले जातात. या वर्णांच्या उच्चारावेळी जिभेचे अग्र दातांच्या मुळाशी किंवा दातांच्या आतील बाजूस स्पर्श करते.
‘त’ आणि ‘थ’ अघोष दंत्य आहेत. ‘द’ आणि ‘ध’ घोष दंत्य आहेत. ‘न’ हा अनुनासिक दंत्य वर्ण आहे. दातांचे उच्चारात एक प्रकारची तीक्ष्णता आणि स्पष्टता असते, जसे अरुणेचा प्रकाश अंधाराला तीव्रपणे भेदतो तसेच. दंत्य वर्ण हे भाषेतील ‘तीक्ष्ण वर्ण’ मानले जातात आणि अरुणेचे तेजस्वी स्वरूप याच्याशीच सुसंगत आहे.
 
६. जयिनी
 
स्वरूप आणि अर्थ
जयिनी म्हणजे जय मिळवणारी, विजयशक्ती. ती सर्व बाधांवर विजय मिळवणार्‍या शक्तीचे प्रतीक आहे. जयिनीदेवी पवर्गाची अर्थात ओष्ठ्य वर्णांची अधिष्ठात्री आहे. ओठांद्वारे उच्चारले जाणारे वर्ण, बाहेरून आत येणार्‍या श्वासाला आकार देतात. जे जयिनीच्या विजयशक्तीशी प्रतीकात्मकदृष्ट्या जुळते.
अधिकृत वर्णसमूह - पवर्ग
पवर्ग (५) : प, फ, ब, भ, म
उच्चारस्थान - ओष्ठ्य
पवर्गातील वर्ण ‘ओष्ठ्य’ आहेत, म्हणजे ओठांपासून उच्चारले जातात. या वर्णांच्या उच्चारावेळी दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात किंवा जवळ येतात.
‘प’ आणि ‘फ’ अघोष ओष्ठ्य आहेत. ओठ बंद होऊन उघडताना वायू बाहेर पडतो. ‘ब’ आणि ‘भ’ घोष ओष्ठ्य आहेत. ‘म’ हा अनुनासिक ओष्ठ्य वर्ण आहे. ओठ बंद असताना, नाकातून वायू जातो. ‘म’ हे मंत्रशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे बीजाक्षर मानले जाते. जयिनीशी या वर्गाचा संबंध हा बाह्यातून अंतर्यात जाणे, म्हणजे विजय मिळवून स्थिरावणे या भावनेशी निगडित आहे.
 
७. सर्वेश्वरी
 
स्वरूप आणि अर्थ
सर्वेश्वरी म्हणजे सर्वांची ईश्वरी, सर्वव्यापी शक्ती. ती सर्वसमावेशक, सर्वव्यापी शक्तीचे प्रतीक आहे. सर्वेश्वरी ही अष्ट वाग्देवतांमध्ये एकमेव अशी देवता आहे, जी दोन भिन्न वर्णगटांची-अंतस्थ आणि ऊष्म-एकत्रित अधिष्ठात्री आहे. हे तिच्या सर्वव्यापित्वाचे प्रतीक आहे.
अधिकृत वर्णसमूह - अंतस्थ + ऊष्म
अंतस्थ (४) : य, र, ल, व
ऊष्म (४) : श, ष, स, ह
एकूण ८ वर्ण.
अंतस्थ वर्णांचे उच्चारस्थान
अंतस्थ म्हणजे आतमध्ये राहणारे. हे वर्ण स्पर्श (व्यंजन) आणि स्वर यांच्यामध्ये असतात; पूर्णपणे व्यंजन नाही आणि पूर्णपणे स्वरही नाही. ‘य’ हा तालव्य अंतस्थ आहे. ‘र’ हा मूर्धन्य अंतस्थ-जिभेचे अग्र टाळूजवळ कंपन पावते. ‘ल’ हा दंत्य अंतस्थ अर्थात जीभ दातांजवळ जाऊन बाजूने हवा सुटते. ‘व’ हा दंत्योष्ठ्य अर्थात दात आणि ओठ यांचा एकत्रित सहभाग असतो.
ऊष्म वर्णांचे उच्चारस्थान
ऊष्म म्हणजे उष्णता असलेले, घर्षणातून उत्पन्न होणारे. या वर्णांच्या उच्चारात श्वास एका संकुचित मार्गातून जाताना घर्षण होते आणि एक प्रकारचे उष्ण, सुरकुत्या असलेले ध्वनी उत्पन्न होतात. ‘श’ तालव्य ऊष्म, ‘ष’ मूर्धन्य ऊष्म, ‘स’ दंत्य ऊष्म आणि ‘ह’ कंठ्य ऊष्म आहे. ‘ह’ हे ‘प्राण’शक्तीचे-जीवनशक्तीचे-प्रतीक मानले जाते. सर्वेश्वरीशी या दोन्ही वर्गांचा संबंध तिच्या सर्वव्यापकतेचे द्योतक आहे.
 
८. कौलिनी
 
स्वरूप आणि अर्थ
कौलिनी म्हणजे कुलाची स्वामिनी किंवा कुलकुंडलिनीशक्ती. ‘कुल’ या शब्दाचा अर्थ श्रीविद्या तंत्रानुसार शरीर, कुटुंब आणि शक्तीचा प्रवाह. कौलिनी ही कुंडलिनी शक्तीचे साक्षात रूप मानली जाते. ती अष्ट वाग्देवतांमध्ये अंतिम आहे आणि वर्णमालेतील संयुक्त, विशेष व उरलेल्या वर्णांची अधिष्ठात्री आहे. म्हणजेच जे सहज विभागांत येत नाही, ते सारे तिच्याकडे येते.
अधिकृत वर्णसमूह - संयुक्त व विशेष वर्ण
संयुक्त वर्ण : ळ, क्ष, ज्ञ
परंपरेनुसार यात आणखी काही विशेष वर्णांचा समावेश होतो. काही आचार्यांच्या मते, ऐ, औ हे संधिस्वरही कौलिनीकडे जातात.
उच्चारस्थान- ‘ळ’ हा मूर्धन्य पार्श्विक वर्ण आहे. जिभेचे अग्र वाकवून, टाळूला स्पर्श करते आणि बाजूने हवा जाते. ‘क्ष’ हा संयुक्त वर्ण आहे, क् + ष = क्ष. कंठ आणि मूर्धा अशा दोन स्थानांचे एकत्रीकरण. ‘ज्ञ’ हा ज् + ञ = ज्ञ असा संयुक्त वर्ण आहे. तालव्य आणि तालव्य-अनुनासिक यांचे मिश्रण.
 
कौलिनीशी संयुक्त वर्णांचा संबंध हा अत्यंत अर्थपूर्ण आहे. जसे कुंडलिनी शक्ती सर्व नाड्यांचे एकत्रीकरण आहे, तसे संयुक्त वर्ण दोन किंवा अधिक वर्णांचे एकत्रीकरण आहे. ‘ज्ञ’ हे ज्ञानाचे बीजाक्षर मानले जाते आणि ‘क्ष’ हा विनाश-पुनर्निर्माणाचा-क्षरण आणि उद्भवाचा वर्ण मानला जातो. कौलिनी या अष्ट वाग्देवतांची परिसमाप्ती दर्शवते; वर्णमाला तिच्यात पूर्ण होते.
 
वशिनी ते कौलिनी - या आठ वाग्देवतांमध्ये संपूर्ण वर्णमाला विभागली आहे. प्रत्येक देवी एका विशिष्ट उच्चारस्थानाशी कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ जोडलेली आहे. तंत्र परंपरेच्या दृष्टीने, हे म्हणजेच देवतेचे शरीरात वास्तव्य. देवता आपल्या प्रत्येक उच्चारात प्रकट होते.
 
या संकल्पनेचा मूळ विचार असा आहे की, भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती सृष्टीची शक्ती आहे. ‘अ’पासून ‘क्ष’पर्यंत प्रत्येक वर्ण म्हणजे एक शक्तिकण आहे. वशिन्यादि अष्ट वाग्देवता या त्या शक्तिकणांचे चैतन्यस्वरूप आहेत.
 
जेव्हा एखाद्या साधकाची साधना परिपक्व होते आणि तो शुद्ध भावाने, निरहंकारपणे या मातृकांची उपासना करतो, तेव्हा त्या प्रसन्न होतात. त्यांची प्रसन्नता म्हणजे केवळ आशीर्वादच नव्हे, तर त्या साधकाच्या वाणीत प्रत्यक्ष वास करू लागतात. परंतु येथे एक महत्त्वाचा टप्पा आहे. अष्ट मातृकांची कृपा जरी झाली, तरी त्यांच्याही अधिष्ठात्री श्री ललिता महात्रिपुरसुंदरी आहेत. श्री ललिता देवी ही परावाक् स्वरूपा आहे, ती स्वतःच मूळ वाणी आहे. तिच्या कृपेशिवाय मातृकांची शक्ती संपूर्णपणे प्रकट होत नाही. जेव्हा मातृकांची कृपा आणि ललितादेवीचा अनुग्रह एकत्र येतो, तेव्हा साधकाला वाचासिद्धी प्राप्त होते.
 
वाचासिद्धी म्हणजे साधकाचे मन, वाणी आणि सत्य हे तिन्ही एकरूप होतात. ‘सत्यं वद’ हा केवळ नैतिक उपदेश नसतो, तर वाचासिद्धीप्राप्त साधकासाठी ती एक स्वाभाविक अवस्था असते. त्याच्या मुखातून जे निघेल ते सत्य होते, कारण त्याची वाणी आता व्यक्तिगत राहिलेली नसते, ती दैवी इच्छाशक्तीचे माध्यम बनलेली असते. अशा साधकाला कवित्वाची प्राप्ती होते. म्हणजेच त्याच्या भाषेतून स्वतःच एक दिव्य लय, एक सौंदर्य, एक अर्थगर्भता प्रकट होऊ लागते; जी श्रोत्याला आतून स्पर्श करते, त्याला विचार करायला लावते, त्याला रूपांतरित करते.
 
असा साधक जेव्हा बोलतो, तेव्हा त्याचे शब्द मंत्रासारखे कार्य करतात. त्यात मोहकता असते, कारण ती ललिता देवीच्या सौंदर्यशक्तीचे प्रकटीकरण असते. त्यात माधुर्य असते, कारण ती मातृकांच्या करुणेचा ओलावा असतो. त्यात सत्यता असते, कारण तो साधक स्वतः अहंकारशून्य झालेला असतो. अशा वाणीला साक्षात सरस्वती अधिष्ठित असते. थोडयात, अष्ट मातृका आणि श्री ललितादेवी यांची संयुक्त कृपा म्हणजेच, साधकाची वाणी ही सामर्थ्यवान परम शांत आणि ऐकणार्‍या सामान्यजनांना मोक्षानुगामी मार्गस्थ करण्याचे सामर्थ्य बाळगून असते.
 
(क्रमश:)
सुजीत भोगले
९३७००४३९०१