मुंबई : (NEET-UG Paper Leak) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण, परीक्षा प्रक्रियेत सातत्याने उघड होत असलेल्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होत असलेल्या खिलवाडाच्या निषेधार्थ नॅशनल टेस्टिंग एजन्सी मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यार्थी परिषदेकडून सांगण्यात आले की, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये वारंवार समोर येणाऱ्या गोंधळांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परिश्रम, विश्वास आणि भविष्यावर थेट आघात होत आहे. नीट-यूजीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत पेपरफुटी होणे ही केवळ प्रशासकीय अपयशाची बाब नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. अनेक वर्षांच्या कठोर तयारीनंतर आणि अथक परिश्रमानंतर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे परिषदने म्हटले आहे.
परिषदेने मागणी केली की, नीट-यूजी पेपरफुटी (NEET-UG Paper Leak) प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि निश्चित कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच तपासाशी संबंधित सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत, जेणेकरून संपूर्ण रॅकेट उघडकीस येऊन त्याचा नायनाट करता येईल आणि देशभरातील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा तात्पुरत्या आणि आउटसोर्सिंगवर आधारित व्यवस्थेच्या भरोशावर सोडता येणार नाहीत, असेही परिषदने स्पष्ट केले. प्रश्नपत्रिका छपाई, परीक्षा केंद्र व्यवस्थापन आणि कर्मचारी नियुक्ती यांसारख्या संवेदनशील जबाबदाऱ्या खासगी संस्थांकडे सोपवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत असून अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढत असल्याचे परिषदने नमूद केले. (NEET-UG Paper Leak)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. विरेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की, “एनटीए कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे अत्यंत दुर्दैवी आहे. नीट-यूजी पेपरफुटीचे हे पहिले प्रकरण नाही. यावरून स्पष्ट होते की, एनटीए परीक्षा संचालनात पूर्णपणे सक्षम नाही आणि यामागे एक संघटित टोळी कार्यरत आहे. परिषद पूर्वीपासूनच परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि सुरक्षित करण्याची मागणी करत आहे. केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत व्यापक संरचनात्मक सुधारणा करून खासगी संस्थांवरील अवलंबित्व संपवले पाहिजे, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी असा खेळ होणार नाही. दिल्लीसह देशभरातील प्रमुख केंद्रांवर अभाविप कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन करत आहेत.”
दिल्ली प्रदेश मंत्री सार्थक शर्मा यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या भविष्यासारख्या गंभीर मुद्द्यावर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे अत्यंत दुर्दैवी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच विद्यार्थीहितासाठी उभी राहिली असून, नीट-यूजी पेपरफुटीमुळे प्रभावित २२ लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत परिषद त्यांच्यासाठी लढत राहील. (NEET-UG Paper Leak)