नीट पेपरफुटी प्रकरणात राज्यात दोन जण अटकेत; 5 संशयित ताब्यात
14-May-2026
Total Views |
मुंबई : (NEET Paper Leak) नीट पेपरफुटी प्रकरणाचा महाराष्ट्राशी असलेला संबंध समोर आला आहे. नाशिकमध्ये बीएएमएसचा विद्यार्थी शुभम खैरनारच्या अटकेनंतर अहिल्यानगरमधील डॉ. धनंजय लोखंडे याला सीबीआयनं अटक करुन ट्रान्सिट रिमांडवर दिल्लीला नेलं आहे. पुणे, अहिल्यानगरमधील आणखी दोन आयुर्वेद डॉक्टर, एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि एका महिलेलाही ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. सीबीआयच्या तपासात राज्यात असलेल्या नेटवर्कचं राजस्थान, बिहार आणि हरियाणामधील आरोपींशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. कुरिअरमार्फत या प्रश्नपत्रिका नाशिकमध्ये पाठवण्यात आल्या, त्यानंतर या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप आणि टेलिग्राममार्फत वितरीत करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. (NEET Paper Leak)
डॉ. धनंजय लोखंडे मध्यस्थ असल्याचा संशय
नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेला डॉ. धनंजय लोखंडे हा या सगळ्या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातील आरोपींमध्ये संपर्क घडवणे, विद्यार्थी आणि एजंट यांच्यात समन्वय साधणे, आर्थिक व्यवहारांत मदत करणे असे आरोप डॉ. लोखंडेवर आहेत. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजलेत, यातही डॉ. लोखंडेचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. (NEET Paper Leak)
लातूरमधील एका खासगी नीट कोचिंग क्लासही यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पालकांच्या तक्रारीनंतर क्लासशी संबंधितांची चौकशी करण्यात येतेय, सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. कोचिंग संस्थेचा चालक आणि काही विद्यार्थ्यांवर पोलिसांचा संशय आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचं जाळं महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, बिहार, उत्तराखंड ते केरळपर्यंत पसरल्याचं समोर आलेलं आहे. सीबीआय चौकशीत आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे.(NEET Paper Leak)