मुंबई : (Mumbai Vidhan Bhavan News) विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांनी गुरूवारी विधानभवन येथे सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्रमोद जठार, सुनिल कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे, माधवी नाईक, डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा सातव, झीशान सिध्दीकी या १० सदस्यांनी शपथ घेतली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. (Mumbai Vidhan Bhavan News)
या शपथविधी सोहळ्यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनातील एन्ट्री लक्ष्यवेधी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा बंगला ते विधानभवन हा प्रवास बाईकने केला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार हेसुद्धा त्यांच्या मागे बसले होते. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी ईव्ही कारने प्रवास केला.
विधानभवनाच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नवनिर्वाचित आ. विवेक कोल्हे यांनी डोक्यावर पांढरी टोपी परीधान केलेली होती. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सबंध आयुष्य सूटबुटाचा त्याग करून शेतकऱ्यांसाठी धोतर आणि पांढरी टोपी परिधान करत शेतकरी हितासाठी आणि सहकार क्रांतीसाठी काम केले. त्यांच्या स्मरणार्थ विवेक कोल्हे यांनी ही टोपी परिधान केल्याचे सांगितले. (Mumbai Vidhan Bhavan News)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....