मालाडच्या शाळेत चालायचा धर्मांतरणाचा अड्डा? ;चंगाई सभेच्या नावाखाली हिंदूंना लक्ष्य; पोलिसांकडून एफआयआर दाखल

    14-May-2026   
Total Views |
Mumbai Religious Conversion Case
 
मुंबई : (Mumbai Religious Conversion Case) मालाड पश्चिम येथील रिजॉईस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान धर्मांतरणाची घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. सदर धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू धर्मीयांना कथितरीत्या ख्रिश्चन धर्मात धर्मांतरीत होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी अंधश्रद्धा पसरवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एफ.आय.आर. दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १० मे रोजी मालाड पश्चिम येथील रिजॉईस इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले बहुतांश लोक हिंदू धर्मीय असल्याचा दावा करण्यात आलाय. “जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी येशूची आराधना करा”, “प्रभू येशू तुमचे आजार बरे करू शकतो” अशा प्रकारच्या गोष्टी सांगून लोकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Mumbai Religious Conversion Case)
 
तसेच कार्यक्रमादरम्यान काही लोकांच्या डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा आव आणण्यात आला. यासोबतच हिंदू देवतांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली असून “हिंदू देव काही कामाचे नाहीत”, “घरात हिंदू देवतांचे फोटो आणि मूर्ती ठेवू नका” अशा प्रकारचे विधान करून उपस्थितांना ख्रिश्चन धर्माप्रती आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे.
 
 
दर रविवारी रिजॉईस इंटरनॅशनल स्कूलमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून हिंदूंना धर्मांतरणासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोपही विनोद शेलार यांनी केलाय. या संदर्भात बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. अंधश्रद्धेच्या माध्यमातून मतांतरण आणि पुढे धर्मांतरण करण्याचे प्रयत्न होत असून त्याचे भविष्यात गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात, असे पोलिसांना सांगण्यात आल्याचे विनोद शेलार यांनी नमूद केले.(Mumbai Religious Conversion Case)
 
या प्रकरणातील आरोपी उषा गुप्ता आणि तिचे सहकारी यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या सभा आयोजित केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या पादरी बाजींदर सिंग यांचे ते अनुयायी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असूनही कठोर कारवाई न झाल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसत नसल्याचेही सांगण्यात आले.
 
धर्मांतरणाचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत!
 
शाळा हे शिक्षणाचे पवित्र ठिकाण असून ते कोणत्याही प्रकारच्या मिशनरी उपक्रमांचे केंद्र बनू नये, ही समाजाची अपेक्षा आहे. फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून धर्मांतरणाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यापुढे मुंबईत कुठेही अशा प्रकारचे धर्मांतरणाचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत!
- विनोद शेलार, महामंत्री, भाजप मुंबई
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक