मुंबई : (Mumbai Drain Cleaning) मुंबईतील नद्या आणि लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असून ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण करावीत. ज्याठिकाणी अजूनही नाल्यांमध्ये गाळ, कचरा साचलेला आहे, अशा नाल्यांमधील गाळ उपशाचा वेग वाढवून कामाची गुणवत्ताही सुधारावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नदी, नाल्यांतील गाळ काढण्याची कामे तसेच रस्त्यांची कामे संपूर्ण मुंबई महानगरात वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील मालाड (पश्चिम) येथील ऑर्लेम चर्च मार्ग मार्वे रस्ता, डी मार्ट जवळील रामचंद्र नाला, गोरेगांव (पश्चिम) येथे मेगा मॉलजवळ ओशिवरा नदी, जुहू येथे इर्ला नाला आणि संत कबीर मार्ग, खार परिसरातील गझधरबांध उदंचन केंद्राजवळ एसएनडीटी नाला आणि वांद्रे (पूर्व) परिसरातील वाकोला नदी तसेच हरणे गुरुजी मार्ग येथील कामांची रितू तावडे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
रितू तावडे म्हणाल्या की, "मालाड पश्चिम परिसरातील मालवणी नाला आणि खार परिसरातील गझधरबांध उदंचन केंद्राजवळ एसएनडीटी नाल्याची स्वच्छता सुरू असली तरी हाताशी असलेला कालावधी आणि उर्वरित स्वच्छतेची आवश्यकता पाहता दोन्ही ठिकाणी कामांचा वेग वाढवा. तसेच या दोन्ही नाल्यांच्या ठिकाणी पुन्हा एकदा आकस्मिक पाहणी करणार आहे. जुहू येथील इर्ला नाल्याच्या एका बाजूला संरक्षक भिंतीचे बांधकाम ढासळले आहे. या ठिकाणी अनेक नागरिक सकाळी सायकलिंगसाठी, व्यायामासाठी येतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या भिंतीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे."(Mumbai Drain Cleaning)
त्या पुढे म्हणाल्या की, "सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करताना रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची काळजी घ्यावी. झाडांची मुळे उघडी होवू नयेत म्हणून त्यांच्या बुंध्याभोवती माती टाका. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही, तसेच सिमेंट काँक्रिटीकरणावेळी स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी." या पाहणीदौऱ्यात रितू तावडे यांनी मालाड पश्चिम परिसरातील महाराणा प्रताप क्रीडांगणालाही भेट दिली. मुंबईतील मोकळ्या भूखंडांवरही अशाप्रकारे क्रीडांगण उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या क्रीडांगणाच्या परिसरातील असलेल्या मोकळ्या जागेवर वाफे तयार करून शहरी शेतीची संकल्पना राबविता येईल, अशी सूचनादेखील महापौरांनी केली.(Mumbai Drain Cleaning)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....