मुंबई : (Konkan Coastal Development) रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जंजिरा जलदुर्ग किल्ल्याजवळ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत उभारण्यात आलेल्या आधुनिक जेट्टी आणि लाटरोधक भिंतीच्या प्रकल्पाचे बुधवार, दि.१३ मे रोजी लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या जेट्टीचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक होणार असून पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, मुरूडच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर, भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजपूरी, दिघी आणि मुरुड खोरा येथून जंजिरा किल्ल्याकडे जाण्यासाठी पर्यटकांना शिडांच्या होड्यांचा वापर करावा लागत होता. मात्र, सुसज्ज जेट्टी नसल्यामुळे पर्यटकांना बोटीतून चढ-उतार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आधुनिक जेट्टी आणि लाटरोधक भिंतीचा प्रकल्प पूर्ण केला आहे.(Konkan Coastal Development)
यावेळी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार राज्यातील ८७७ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. पर्यटन, जलवाहतूक आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टींना चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री राणे म्हणाले की, “जंजिरा परिसरातील पर्यटकांना होत असलेली गैरसोय आणि काही अपघातांच्या घटना लक्षात घेऊन हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटन अधिक सुरक्षित आणि आकर्षक बनेल.”
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या जलवाहतूक विकासाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती देताना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांना भविष्यात जलमार्गाने जोडण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले. मुंबई वॉटर मेट्रोप्रमाणेच कोकणातही जलवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Konkan Coastal Development)
यावेळी मंत्री राणे यांनी पर्यावरणपूरक जलवाहतुकीवर भर देत भविष्यात बोटी इलेक्ट्रिक करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन केले. बोट चालक आणि मच्छीमार बांधवांनी पुढाकार घेतल्यास शासन आणि बँकांच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.(Konkan Coastal Development)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.