असे काही घडायला हवे!

    14-May-2026   
Total Views |
Justice Against Sexual Crimes
 
जिला परिस्थितीचे आकलन नाही, काही कळत नाही, अशा गतिमंद असलेल्या बालिकेला पाहून खरेतर कोणत्याही माणसाच्या मनात करुणा दाटून येईल. मात्र, मुंबईतील घाटकोपर येथील पार्कसाईटमध्ये मागासवर्गीय समाजाच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार झाला. यातूनच ती निष्पाप बालिका गरोदर राहिली. त्या बालिकेला समजही नाही की, तिच्यावर त्या नराधमाने काय प्रसंग आणला आहे. अत्याचार झाला आहे, आपल्यावर जबरदस्ती मातृत्व लादले गेले, आपण गरोदर आहोत, हेसुद्धा त्या बालिकेला कळत नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कोण? तर, ३१ वर्षांचा नफीज अहमद ऊर्फ सलमान! बालिकेसोबत क्रूर आणि अश्लाघ्य कृत्य करणार्‍या या नराधमाला कायदा-सुव्यवस्था जी सजा देईल, ती कमीच आहे.
 
ती बालिका नेहमी बेकरीमध्ये पाव आणायला जायची. याचाच गैरफायदा घेत, त्या नराधमाने या बालिकेवर अत्याचार केला. लिंगपिसाट या राक्षसांना सजा काय द्यायची? ‘पॉक्सो’अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. पुन्हा साक्षी-पुरावे आणि बरेच काही मिळून तो त्यातून सुटेल किंवा काही वर्षांची सजा भोगून तो राजरोसपणे बाहेर येईल. अशा घटनांबाबत समाजाची स्मृती, त्यातही हिंदू समाजाची स्मृती तर कायम कमीच आहे, असे दिसून येते. त्यामुळे हा नराधमाचे कुकृत्य लोक विसरूनही जातील. काही लोक लक्षात ठेवतील. पण, झाले ते झाले, आपल्याला काय करायचे? असे म्हणून दुर्लक्ष करतील. तर, आपलेच काही हिंदू म्हणतील, गुन्ह्याची सजा भोगून आला. आता आणखी किती सजा द्यायची? या पार्श्वभूमीवर ती बालिका? सरकारी मनोधैर्य योजनेतून साहाय्य मिळेल. कदाचित, त्या नराधमाच्या घरावर बुलडोझर चालवला जाईल. पण, त्या राक्षसाची विकृत मानसिकता संपेल का? राजकीय नेते चार दिवस आंदोलन करतील, त्यांनी ते करायलाही हवे. पण, सामान्य जनतेचे काय? अत्याचार झाला,
चार दिवस बातम्यांचा धुरळा उडवतात, तो पाहात बसायचा का? हिंदूच्या मुली अत्याचार करण्यासाठीच असतात, अशी विकृत मानसिकता ठेचायलाच हवी. कोणाच्याही मुलीवर अत्याचार केला, तर त्याचा परिणाम काय होईल, या विचाराने विकृत नराधमासकट त्याच्या सात पिढ्या थरथर कापायला हव्यात, असे काही कायद्याच्या कक्षेतूनही घडायला हवे.
 
संविधानविरोधी जलील...
 
"मतीन पटेलचे घर तोडले, तर आम्ही त्याला असे आलिशान घर बांधून देऊ की, तोडणारे ते पाहत राहतील,” असे नावातच ‘जलील’ असलेला आणि आता कुठेच सत्ताकारणात नसलेल्या एमआयएमच्या माजी खासदार इम्तियाज जलीलने म्हटले. हिंदू मुलींचे शोषण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या निदा खानला सहकार्य करणार्‍या, तिला लपवून ठेवणार्‍या मतीन पटेलवर कायदेशीर कारवाई झाली, तर त्या कारवाईला इम्तियाज जलीलने आव्हान दिले. कायदेशीर कारवाईला विरोध म्हणजे संविधानाला विरोध!
 
गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची ही वृत्ती येते कुठून? "आम्ही या देशाचे अल्पसंख्याक आहोत. आमच्यावर बहुसंख्य हिंदू अत्याचार करतात,” अशा खोट्या आरोळ्या ठोकत काहीकाळ खासदारकी भोगणारे जलील. खासदार असताना ‘अ‍ॅट्रोसिटी’ गुन्ह्याचे आरोपही जलील यांच्यावर झाले. मागासवर्गीय समाजबांधवांचा अपमान करणे, जातिवाचक शब्द वापरणे, ‘लव्ह जिहाद’च्या घटनेचे समर्थन करणे, एक ना अनेक घटनांमधून जलील यांचे हिंदुद्वेष्टेपण सातत्याने उघड होत गेले. आताही नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’मध्ये सहभागी असलेल्या निदा खानचे समर्थन का? ती मुस्लीम आहे म्हणून? ती मुस्लीम आहे म्हणून तिचे गुन्हे, गुन्हे नाहीत? ज्या मुलींचे शोषण झाले, त्या हिंदू आहेत म्हणून त्या काय माणूस नाहीत? कदाचित, इम्तियाजला असेच वाटते का? त्यामुळेच इम्तियाज निदा खान या गुन्हेगार महिलेचे समर्थन करणार्‍या मतीन पटेलची भलावण करत आहे. यावर वाटते की, इम्तियाज याच्या कौममध्ये सगळे प्रश्न सुटलेत का? गरिबी नाही, अज्ञान नाही, उच्चशिक्षणाचा दर्जा वाढला आहे, महिलांचे अजिबात शोषण होत नाही, इतर समाज संशयाने पाहात नाहीत, सगळीकडे समता आणि शांती आहे, असे काही आहे का? तर, तसे अजिबात नाही. पण, त्या सगळ्या प्रश्नांकडे न पाहता, ‘मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार,’ असे जलील म्हणाला आहे. गुन्हेगार कौमचा आहे म्हणून त्याची पाठराखण करणार्‍या जलीलला पाहून वाटते की, मतीन पटेलचे समर्थन ही घटना हिमनगाचे टोक आहे का? यापूर्वीही केवळ ‘कौम का हैं’ म्हणून गुन्हेगारांचे समर्थन आणि सहकार्य केले असेल का? थोडक्यात, संविधानविरोधी जलील!
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.