गीतासार - भाग १४

    14-May-2026
Total Views |
Geetasar Part 14
 
राधा
 
सामान्य व्यक्तींच्या शरीरात एक प्राकृतिक ‘धारा’ असते. तिला कठीण साधनेने जो साधक बरोबर उलटी करून ‘राधा’ म्हणजे ‘आनंदमयी’ बनवतो, ज्याला कबीर ‘राधा’ म्हणतात, जी भगवान कृष्णाला परस्त्री असूनही अतिशय प्रिय होती. साधकाच्या शरीरात जन्मतःच ज्या शक्तिधारा असतात, त्याला योगशास्त्रात ‘कुंडलिनी रचना’ म्हणतात. प्रखर साधनेनंतर साधकाची चित्तशुद्धी होते. मनाचा आणि शरीराचा संबंध खूप जवळचा असतो. वृत्तीबदलामुळे शरीरदेखील सुंदर बनते. म्हणून सर्व संत दिसावयास सुंदर व सर्वगुणसंपन्न असतात. धारा हळूहळू बदलून उलट होते, त्यालाच वेदव्यास ‘राधा अवस्था’ म्हणतात. साधकाचा विवाह आपल्या जन्मतः प्राप्त प्राकृतिक काया रचनेशी होतो. ही प्राकृतिक काया रचना ‘धारा’ बदलून, साधनेत ती अति आनंददायक म्हणजेच ‘राधा’ बनते. ही काया आता साधकास परकी वाटते, कारण ही काया जन्मतः प्राप्त काया रचनेपेक्षा वेगळी असते. म्हणून ‘राधा’ एक परस्त्री दाखविली आहे, जिच्यावर भगवान कृष्ण अत्यंत प्रेम करतात.
 
असे राधा-कृष्णाचे दिव्य प्रेम संसारात विख्यात आहे. परंतु, ते स्त्री-पुरुषांचे सामाजिक प्रेम नसून, आध्यात्मिक अवस्थेचे आहे. हे धर्माच्या नावाखाली विकृत लीला करून धर्माला काळिमा फासणार्‍या, तथाकथित महात्मा व त्यांना बळी पडणार्‍या भोळ्या-भाबड्या जनतेनेसुद्धा जाणून घ्यावे. कृष्ण १४ वर्षांचा आणि राधा त्यावेळेस ३६ वर्षांची दाखविली आहे. एक किशोर आपल्या आईच्या वयाच्या परया स्त्रीबरोबर सर्वांदेखत प्रेमालाप करेल काय? व्यासांच्या दृष्टीने याचे कारण साधनेला व बुद्धिमत्तेला धरून आहे. विद्या १४ असून, शेवटची १४वी विद्या आत्मविद्या मानली जाते. यामध्ये साधक श्रीकृष्ण परिपूर्ण असतो. याच योगसाधनेमुळे त्याची जन्मतः असलेली काया रचना बदलून, साधना करण्यासाठी अत्यंत आनंदमय बनते, जिच्या द्वारे तो आपल्या जीवनरूप कुंडलीचे सर्वच्या सर्व म्हणजे ३६ गुण पूर्णपणे मिळवू शकतो. ज्या पती-पत्नींच्या कुंडलीत ३६ गुण जमतात, ते सुखाने संसार करतात हे आपणास ठावूकच आहे. हेच ते राधेचे ३६वे वर्ष होय. अशा प्रकारे १४ वर्षांचे भगवान कृष्ण, ३६ वर्षांच्या एका परस्त्रीबरोबर शृंगार करतात. राधा-कृष्णाचे हे अमर प्रेम किती साधक जाणतात?
 
द्रौपदी वस्त्रहरण
 
द्रौपदी वस्त्रहरणाचीही कथा आहे. येथे ‘वस्त्र’ म्हणजे ‘वृत्ती’ असे ध्यानात घेतल्यास सर्व कथा नीट समजेल. मूळ चित्त हे शुद्धच असते. वस्त्रे ज्याप्रमाणे शरीराला झाकतात, त्याप्रमाणेच मानवी चित्ताला वाईट व चांगल्या वृत्ती झाकतात. त्यामुळे अज्ञानाची उत्पत्ती होते. पांडववृत्तीचे रूप म्हणजे द्रौपदी. कौरवी वृत्ती पांडवी वृत्तीचे वस्त्रहरण करू पाहते आणि तेसुद्धा अशा वेळी, की ज्यावेळी पांडवी वृत्ती द्युतामध्ये (मायेत) कौरवांकडून हरते. शरीराचे वाईट प्रकारे शासन करणारा (दुःशासन), पांडववृत्तीचे वस्त्रहरण द्रौपदी वस्त्रहरणाद्वारे करू पाहतो. द्रौपदी सदासर्वदा पांडवांजवळ का असते? द्रौपदी पांडवांची वृत्तीकाया आहे, जड शरीरी पत्नी नव्हे!
 
द्रौपदीची थाळी वबला-अतिबला सिद्धी
 
एक वेळची गोष्ट आहे. द्युतातील अटीनुसार पांडव वनवासात होते. दुष्ट दुर्योधन तेथेही त्यांना त्रास देणार होता. त्याने शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना पांडवांकडे पाठविले. दुर्वास ऋषी पांडवांच्या कुटीपाशी आले. त्यावेळी सर्व पांडव बाहेर गेले होते आणि द्रौपदी घरी एकटीच होती. दुर्वास ऋषींबरोबर त्यांचे दहा हजार शिष्यसुद्धा होते. म्हणजेच, दहा इंद्रियांची एक हजारपट कुशक्ती होती. दुर्वासांनी द्रौपदीला सांगितले की, ते आपल्या दहा हजार शिष्यांसह गंगातीरावर स्नान करून लगेच परत येत आहेत. इतया वेळात द्रौपदीने त्यांच्यासाठी पंचपक्वानांचे भोजन तयार ठेवायचे, असे न झाल्यास, दुर्वास ऋषी कोपित होऊन द्रौपदीसह पाच पांडवांना नष्ट करतील. द्रौपदीच्या घरात तर एकही दाणा नव्हता. त्यावेळी द्रौपदीने कृष्णाचे स्मरण केले. भगवान कृष्ण खर्‍या भक्तांचे मागणे ऐकतातच. त्याचवेळी भगवान द्वारकेकडून त्या वनात जेथे पंचप्राण बसत होते, तेथे आले. द्रौपदीने तिच्यावरचे संकट सांगितले; परंतु स्वतः कृष्णच भुकेलेले होते. ते द्रौपदीजवळ काही खाण्यासाठी मागू लागले. घरात तर काहीच नव्हते. कृष्णाने सांगितले की, जेवणाच्या रिकाम्या भांड्यात भाजीचे एक पान आहे. द्रौपदीने पाहिले, तर खरोखरच भांड्यात एक भाजीचे पान होते. कृष्णाने ते खाल्ले आणि तृप्तीचा ढेकर दिला. झाले! त्याचवेळी तिकडे गंगेवर असलेल्या दहा हजार शिष्यांसह दुर्वासांनाही, ढेकर येण्यास सुरुवात केली. आता काय खाणार? दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसह परस्पर गंगातीरावरून निघून गेले. येथे गंगा म्हणजे ज्ञानरूप गंगाधारा मानावी. ज्ञानतृप्तीने ते सर्व दुर्योधनाची राजधानी हस्तिनापुरात परत गेले.
 
योगसाधना करता करता काही बंध सिद्ध होतात. ज्यामध्ये तिसरा बंध जालंधर बंध आहे (मूलबंध, उड्डियान बंध आणि जालंधर बंध). जालंधर बंध कंठाच्या ठिकाणी असतो. तेथेच एक ग्रंथी असते. तिचे नाव आहे कंठग्रंथी (Thyroid glad). ही ग्रंथी सिद्ध झाल्यावर, साधकाचा आहार व तृष्णा जवळजवळ संपते. या सिद्धींना ‘बला-अतिबला विद्या’ म्हणतात. यासाठीच श्रेष्ठ योगी अत्यंत अल्प आहार व पाणी, यांवर आपली जीवनयात्रा चालवतात. काही योगी तर काहीही अन्न ग्रहण न करताही, आपली शरीरयात्रा चालवतात. त्या महान योगसिद्धीचे वर्णन भगवान वेदव्यासांनी द्रौपदीच्या थाळीच्या कथेद्वारे केले आहे. महाभारतच्या युद्धात रणात द्रौपदी स्वतः हजर असते. वृत्तीरूप युद्धात वृत्तीकाया द्रौपदी अवश्य उपस्थित राहणारच. स्वर्गारोहणाच्या वेळीही द्रौपदी पांडवांबरोबरच राहते व ती पांडवांच्या आधीच मरते. आत्म्याने शरीराचा त्याग केल्यावर सार्‍या वृत्ती शांत होतात, हाच द्रौपदीचा मृत्यू होय. भगवान श्रीकृष्ण यासाठी द्रौपदीवर अतिशय प्रेम करीत होते, परंतु बहीण या नात्याने! कुंतीचे एकूण चार पुत्र. त्यांपैकी कुंतीच्या कौमार्य अवस्थेतील कर्ण हा पहिला व त्यानंतर तिचा पंडुबरोबर विवाह झाल्यानंतर तिला तीन पुत्र झाले. हे तीन पांडव पंडुला कुंतीद्वारे नियोगाने प्राप्त झाले. नियोग म्हणजे परपुरुषाशी मैथुन नसून, तत्त्वचिंतनाने प्राप्त झालेली त्या त्या तत्त्वाची एकरूपता होय.
 
योगिराज हरकरे
क्रमशः
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७