मुंबई : (Devendra Fadnavis Statement) आंतरराष्ट्रीय परिस्थिती तयार झाल्यावर देशहितासाठी आम्ही थोडेही जुळवून घ्यायला तयार नसू तर, विरोधी पक्षाकडे प्रगल्भता नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निर्देश देशहिताकरिता आहे. त्यामुळे आम्ही आपापल्या परीने जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. प्रतीकात्मकरीत्या त्याचा प्रचार झाला पाहिजे. राज्यातील नेतेमंडळी ज्यावेळी असा प्रचार करतात तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचते. म्हणून मी आज इथे मोटारसायकलने आलेलो आहे. आम्ही आता आमचा ताफा कमी केला आहे. तसेच सर्वांचे परदेश दौरे रद्द केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत आणि परकीय चलन बचत कशी करता येईल, हा आमचा प्रयत्न असेल. उद्या साताऱ्याला असलेला कार्यक्रमाची तयारी झाली असल्याने तो कार्यक्रम रद्द केलेला नाही. पण यानंतर पुढचे ६ महिने मोठे शासकीय आयोजन करणार नाहीत."(Devendra Fadnavis Statement)
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "जगातील सगळे देश यापेक्षाही कठोर निर्णय घेत असताना आपल्याला पंतप्रधानांनी थोडासा त्याग करायला सांगितला आहे. कुठलेही कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्यावर इतका गदारोळ उभा करणे योग्य नाही. यापुर्वी इंदिरा गांधी, नरसिंहराव आणि चिंदबरम असतानादेखील अशा उपायोजना करण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे दुटप्पी वागणे योग्य नाही."(Devendra Fadnavis Statement)
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्न निर्माण करणे मुर्खपणा
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, "देशाच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, यापेक्षा जास्त मूर्खपणाचे लक्षण असू शकत नाही. पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, तेव्हा धोरणात्मक निर्णय होतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे विदेश दौरे करू नका, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. याचा अर्थ आपला एखादा व्यापारी परदेशात मोठा करार करत असल्यास तो त्यांनी करू नये, असा होत नाही. त्यामुळे बिनडोकपणे अशी टीका करू नये."(Devendra Fadnavis Statement)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....