शाळा-कॉलेजेस ऑनलाईन, सरकारी कार्यालयात दोन दिवस वर्क फ्रॉम होम, मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (Delhi Work From Home Decision) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीच्या केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पेट्रोल-डिझेलची बचत करण्यासाठी आणि ऊर्जा संकट टाळण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. दिल्लीतील सरकारी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयं ऑनलाईन चालवण्याचे आदेश दिले आहेत. तर न्यायालयीन कामकाजही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावं, असं आवाहनही दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलंय.
काटकसरीच्या या आवाहनाला माझा भारत, माझं योगदान असं नाव देण्यात आलंय. य़ा अभियानानुसार आता दिल्लीतील सरकारी कार्यालयांच्या वेळांत बदल करण्यात आला असून, आठवड्यातील दोन दिवस सरकारी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. इंधन आणि वीज बचतीसाठी ही पावलं उचलण्यात आलीयेत.(Delhi Work From Home Decision)
दिल्ली सरकारचे महत्त्वाचे निर्णय
१. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल - दिल्लीतील सरकारी कार्यालय आता सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७ पर्यंत खुली असतील. तर दिल्ली महापालिकेतील कार्यालयांची वेळ सकाळी ७.३० ते ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
२. वर्क फ्रॉम होम- दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्यात आलंय. खासगी कंपन्यांतही वर्क फ्रॉम सुरु व्हावं, यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.
३. ऑनलाईन मिटिंग- दिल्ली सरकारच्या ५० टक्के बैठका आता ऑनलाीनच होतील, असे आदेश जारी करण्यात आलेत.
४. मेट्रो मंडे- सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा यासाठी प्रत्येक सोमवारी मेट्रोचा वापर करण्यासाठी मेट्रो मंडेची घोषणा करण्यात आलीय. सरकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यास त्यांच्या ट्रान्सपोर्ट अलाऊन्समध्ये १० टक्के वाढ करण्यात येणार आहे.
५. नो व्हेकल डे- आठवड्यातील एक दिवस कोणतंही वाहन वापरु नये, असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय.
६. व्हीव्हीआयपी कल्चरवर लगाम- पुढील वर्षभर राज्य सरकारमधील एकही अधिकारी आणि मंत्री परदेश प्रवास करणार नाही.(Delhi Work From Home Decision)