...ही तर चीनची धुरंधर!

    14-May-2026
Total Views |
China Spy Network Exposed
 
अमेरिका आणि चीन यांच्यातील नाते साप आणि मुंगुसाचे. अमेरिकेच्या जनतेच्या मनातील चीनविषयीचा वैरभाव कमालीचा. असे असले, तरी अमेरिकेने आजवर कधीही चीनविरोधात मोठी कारवाई केल्याचे स्मरणात नाही. त्याचे कारण, चीनने अमेरिकेच्या यंत्रणांमध्ये केलेली घुसखोरी. आज चीनने त्यांच्या अर्थकारण, प्रशासन, राजकारण, संरक्षण जवळपास अशा सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. एकीकडे ट्रम्प चीन दौर्‍यावर असताना, दुसरीकडे अमेरिकेतील अर्केडिया शहराच्या माजी महापौर ईलीन वँग या चीन गुप्तहेर असल्याचे समोर आले. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी चीनसाठी काम केल्याचा आरोप वँग यांच्यावर करत, त्यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात खटला भरला. वँग यांनीही न्यायालयामध्ये वर्ष २०२० ते २०२२ याकाळात चीनच्या ‘कम्युनिस्ट’ पक्षाच्या अजेंड्याला धरून काम केल्याचे मान्य केले. चीनच्या विचारांचा अमेरिकेमध्ये प्रसार करण्यासाठी ‘यूएस न्यूज सेंटर’सारखे एक संकेतस्थळही चालवले होते. वँग यांच्या प्रकरणामुळे अमेरिकेतील चिनी-विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
 
मुळातच, सांप्रत काळात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी युद्धे ही रणांगणावर लढली जात. अलीकडे शत्रूला प्रत्यक्ष युद्धाआधीच नामोहरम करण्यासाठी गुप्तचरांचा वापर वाढला आहे. प्रत्येक देशाच्या गुप्तचर संस्था त्यांच्यावरच्या राष्ट्रसंरक्षणाची जबाबदारी निभावताना दिसतात. यामध्ये इस्रायलची ‘मोसाद’, ब्रिटनची ‘एमआय ६’, भारताची ‘रॉ’, अमेरिकेची ‘सीआयए’ अशी काही नावे समोर येतात. चीनदेखील अशा गुप्त कारवायांसाठी प्रसिद्ध असून, शत्रूदेशाच्या यंत्रणांमध्ये गुप्तहेर घुसवून यंत्रणा आतून खिळखिळी करण्याचे प्रयत्न चीनने याआधीही अनेकदा केले आहेत. यामध्ये ‘हनी ट्रॅप’ हा चिनी गुप्तचर संस्थेचा आवडता मार्ग असून, एखाद्या देशातील राजकारणी, अधिकारी यांना या माध्यमातून अडकवण्याचे प्रकार चीनने याआधी अनेकदा केले आहेत. एका अहवालानुसार, वर्ष २०२५ मध्ये चिनी गुप्तचर संस्थेने ‘हनी ट्रॅप’ पद्धतीचा अवलंब करून एक हजारांपेक्षा अधिक मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
 
चीनच्या गुप्त कारवायांचा इतिहास फार जुना नसला, तरी गेल्या दोन दशकांत चीनने अत्यंत वेगाने यावर पकड मिळवलेली दिसते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा यांसारख्या देशांनीही चीनवर संशोधन चोरी, सायबर हेरगिरी आणि राजकीय हस्तक्षेपाचे आरोप अनेकदा केले. विद्यापीठांतील संशोधन प्रकल्प, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण तंत्रज्ञान आणि संवेदनशील औद्योगिक माहिती मिळवण्यासाठी चीन विविध मार्गांचा वापर करीत असल्याचे पाश्चिमात्य सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
 
अमेरिकेतील ‘वँग’ प्रकरणाआधी ‘फँग फँग’ प्रकरणाने अमेरिकेच्या राजकारणात मोठीच खळबळ उडवली होती. विद्यार्थी म्हणून गेलेल्या क्रिस्टीन फँग ऊर्फ फँग फँग या चिनी महिलेने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात जवळीक निर्माण करून संवेदनशील माहिती गोळा केल्याचा प्रकार त्यावेळी उघडकीस आला होता.
 
चीनची रणनीती पारंपरिक हेरगिरीपेक्षा वेगळी आहे. त्यात आर्थिक गुंतवणूक, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक संबंध, माध्यमांवरील प्रभाव आणि समाजमाध्यमांवरील प्रचार यांचा संगम दिसतो. ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’सारख्या प्रकल्पांद्वारे आर्थिक गुंतवणुकीचे जाळे उभे करतानाच, स्थानिक सत्ताकेंद्रांशी जवळीक निर्माण करण्याची नीती चीनने स्वीकारण्यासाठी चीन अशा छुप्या पद्धतींचा अवलंब करतो.
 
भविष्यात वँग यांच्यावर खटला चालवण्यात येऊन, त्यांना दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. यापलीकडे अमेरिका चीनविरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता नाही. याचे कारण, चीनने केलेली अमेरिकेच्या ‘बॉण्ड’ अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक. आजमितीला चीनची अमेरिकेच्या ‘बॉण्ड’मध्ये असलेली गुंतवणूक सात ते आठ टक्क्यांच्या आसपास असून, यामुळे अमेरिकेचे हात बांधलेले आहेत. तसेच वरवर कितीही सुरक्षित असल्याचे अमेरिका दिखावा करत असली, तरी त्यांच्या यंत्रणेतील पोकळ दुवे ‘वँग’ प्रकरणाने उजेडात आणले आहेत. त्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे’ अमेरिकेला क्रमप्राप्त. बाकी सध्या काळ अमेरिकेसाठी प्रतिकूल असून, एकीकडेे इराणने अमेरिकेच्या संरक्षणसिद्धतेचे वाभाडे काढले, तर चीनच्या वँग यांनी ‘धुरंधर’ होत, अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेची लक्तरेच वेशीवर टांगली!
 
कौस्तुभ वीरकर