दिल्लीत ब्रिक्स बैठकीत इराण युद्ध, तेलदर आणि सागरी सुरक्षेवर चर्चा
14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (BRICS Discussions On The Iran Conflict) भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीत गुरुवार, दि. १४ मे रोजी पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इराणमधील संघर्ष, जागतिक ऊर्जा संकट, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि सागरी सुरक्षेचे मुद्दे केंद्रस्थानी राहिले.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उद्घाटनप्रसंगी होर्मुर्झ सामुद्रधुनी आणि लाल समुद्रातील निर्बंध सागरी वाहतूक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी समुद्री मार्ग सुरक्षित राहणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. बैठकीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यासह ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इतर सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. चीनचे परराष्ट्र मंत्री अनुपस्थित राहिल्याने चीनकडून वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
इराणने ब्रिक्स देशांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधात स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. मात्र या मुद्द्यावर सदस्य देशांमध्ये एकमत दिसून आले नाही. विशेषतः इराण आणि युएई यांच्यातील मतभेदांमुळे संयुक्त भूमिका घेणे कठीण ठरत असल्याचे चित्र दिसले.
बैठकीत डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, स्थानिक चलनात व्यापार वाढवणे, विकसनशील देशांच्या हितांचे संरक्षण आणि जागतिक आर्थिक स्थैर्य या विषयांवरही चर्चा झाली. ‘ब्रिक्स@20 ही परिषद ‘सक्षमता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. दरम्यान, अमेरिका-चीन चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीकडे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. (BRICS Discussions On The Iran Conflict)