मुंबई : (AI Data Center Project Maharashtra) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी उद्योग विभाग आणि 'एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड' समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला असून या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल ८ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.
या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात 'इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क' आणि 'एआय कॉम्प्युट हब' उभारला जाणार आहे. यासाठी कंपनी १ लाख १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा ८ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.(AI Data Center Project Maharashtra)
हा प्रकल्प ५०० मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये २ लाख ५० हजार उच्च क्षमतेचे 'एआय चिपसेट्स' वापरले जातील. तसेच या प्रकल्पाचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येईल. २०० मेगावॅट क्षमतेचा पहिला टप्पा सन २०२८ पर्यंत तर ३०० मेगावॅट क्षमतेचा दुसरा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरण २०२३ तसेच हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क धोरण २०२४ अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे.(AI Data Center Project Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....