संग्रामबापू यांची ‘शाईफेक’ एक सूचक संकेत!

    13-May-2026
Total Views |
Sangrambapu Bhandare Protest
 
वारकरी संप्रदायात धर्मांधांची घुसखोरी वाढल्याच्या शरद पवार यांच्या वादग्रस्त भूमिकेवरुन मागे वादंग उठला होता. वारकरी संपद्रायातूनही पवारांच्या त्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेण्यात आला. परवा त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवारांच्याच भूमिकेची री ओढत, वारकरी संप्रदायातील कथित ‘घुसखोरां’ची यादी जाहीर केली. परिणामी, लवांडे यांच्या या बेताल कृतीचा शाईफेक करुन एक सूचक इशाराच संग्रामबापू भंडारेंनी दिला आहे. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायात वारंवार फूट पाडणार्‍या अशा अश्लाघ्य प्रयत्नांचा समाचार घेणारा हा परखड लेख...
 
परकीय इस्लामी आक्रमकांच्या जुलमी राजवटीत वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गाने हा देश, येथील संस्कृती आणि सामान्य माणसाच्या रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. देव-देश-धर्माच्या रक्षणार्थ वारकरी संप्रदाय सदैव अग्रेसर होता. परंतु, महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यापासून वारकरी संप्रदायाबाबत काही ठरावीक राजकीय व्यक्ती निरर्थक चर्चा घडवून वारकरी संप्रदाय जणूकाही आपल्या मक्तेदारीचा संप्रदाय असल्याचा आव आणून, वारकरी संप्रदायात फूट आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
वास्तविक पाहता, वारकरी संप्रदायात घुसखोरी होत आहे, असा कांगावा करून त्यांची यादी घोषित करण्याचा अधिकार विकास लवांडे सारख्यांना नेमका कोणी दिला? वारकरी संप्रदायातील इतरांना ‘घुसखोर’ म्हणणारे लवांडे कोण आहेत? वारकरी संप्रदाय कोणाची मक्तेदारी किंवा जहागिरी नसून, वारकरी संप्रदाय समता व समरसतेचा पुरस्कार करणार्‍या सामान्य माणसाचा भक्तिमार्ग आहे. त्यामुळे वारकरी बंधूंमध्ये फूट व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या फुटीरवादी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संग्रामबापू भंडारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुढारी असलेल्या विकास लवांडे यांच्या अंगावर फक्त शाईफेकद्वारे निषेध व्यक्त करून सावध इशारा दिलेला आहे.
 
खरं तर यापूर्वीसुद्धा विकास लवांडे यांनी गड-किल्ले मोहिमेवर टीका-टिप्पणी करून धारकरी बंधूंना, हिंदू तरुणांना ‘आतंकवादी’ करण्याचा प्रकार म्हणत, धर्मविरोधी वक्तव्य केले होते. संत तुकोबांनी दांभिक आणि दुष्ट व्यक्तीस त्यांच्या भाषेत कठोर कृती करण्याचा वास्तववादी आपल्या अभंगात ‘अधमाशी अधम आणि भले तरी देऊ कासेची लंगोटी’चा संदेश दिलेला आहे. त्यामुळेच संग्रामबापू यांनी लवांडे-प्रवृत्तींना तुकोबांचा फक्त अल्प सूचक संकेत देण्याचा प्रयत्न करून सावध इशारा दिलेला आहे. हिंदू आता जागृत झालेला असून, आपल्या प्राणप्रिय धर्मावरील चिखलफेक अमान्य आहे. त्यामुळे लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक ही फक्त आता सुरुवात म्हणावी लागत असून, संग्रामबापू भंडारे यांचे कौतुक करण्यास हरकत नाही.
 
संग्रामबापू भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर केलेल्या शाईफेक प्रकरणाचा मागोवा घेतल्यास किंवा ही आग कोणी लावली, त्यामध्ये पेट्रोल टाकण्याचे काम कोणी केले, याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, गेल्या तीन-चार वर्षांपासून पंढरपूरच्या वारीमध्ये निधर्मी, दांभिक मंडळी, नकली वारकर्‍यांचा वावर वाढला होता. भोळ्या वारकरी बंधूंमध्ये फूट व संभ्रम निर्माण करण्यासाठी ‘संविधान वारी’ ते ‘निधर्मी वारी’ असे प्रयोग करून वारीत चक्क ‘शिरखुर्मा’ आणि ‘बायबल’ वाटप करण्यात आले. परंतु, जागरूक वारकरी बंधूंनी दांभिक प्रकारास विरोध करून आळा घातला आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारांनी दांभिकांचा खरा चेहरा समोर आणला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आध्यात्मिक आघाडीने पुण्यात दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ‘वारकरी संमेलन’ घेतले. ‘वारी’ विषयावर मंथन होऊन शरद पवार यांनी त्याच संमेलनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये धर्मांधांचा वावर वाढतोय, असे वक्तव्यसुद्धा केले होते. वास्तविक पाहता, वारकरी संप्रदायात कोणी धर्मांध नाही आणि कोणत्याही वारकर्‍यांनी ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्या नाहीत किंवा कधीच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणारी कट्टरतेची शिकवण कधीच दिलेली नाही. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म| भेदाभेदभ्रम अमंगळ॥’ हा सहिष्णू आणि उदात्त विचार घेऊन वारकरी संप्रदायाची वाटचाल सुरू असून, सतत वर्धिष्णू ठरत आहे. वारकरी संप्रदायाचा पाया मुळातच अध्यात्माचा असून, ‘रामायण’, ‘महाभारत’ जीवनमूल्ये आहेत. तसेच ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र आहे. परंतु, शरद पवार यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवास पाहता, त्यांना ‘राम कृष्ण हरी’ मंत्राचे वावडेच असल्याचे लक्षात येते. विकास लवांडे यांनी शरद पवार यांना अपेक्षित असलेली खोटी राजकीय पोपटपंची करण्याचा प्रयत्न केला. पण, संग्रामबापू भंडारे यांनी फक्त शाईफेकीचा निषेध नोंदवून अल्प दणका दिला असून, असा दणका देणे एकप्रकारे आवश्यकसुद्धा होते. त्यामुळे भविष्यात कोणालाही लवांडेसारखी पोपटपंची करताना दहावेळा विचार करण्यास प्रवृत करणारी घटना म्हणावी लागेल. खरं सांगायचे तर, राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांच्या नावाचा जप करून केवळ सत्तेचा आनंद लुटला. पण, सत्तेला जेव्हा घर घर लागली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडून ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ असे म्हणणे सुरू केले. आता त्यांना वारकरी संप्रदायाची साथ हवी आहे, म्हणून वारकरी संप्रदायाप्रती पुळका व्यक्त करण्याचे प्रकार सुरु दिसतात.
 
शरद पवार यांनी पुण्यातील ‘वारकरी संमेलना’मध्ये जे वक्तव्य केले होते, त्याच वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी दिल्लीमध्ये केला. दि. ११ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये महिला शासकीय अधिकार्‍यांचे ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ झाले. या संमेलनासाठी प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी लेखन करून वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचे भाष्य करून, "वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात” असे आपल्या लेखात म्हटले. शरद पवार यांच्या याच ६० टक्के भाष्याचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दि. १६ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पूर्व स्वभावानुसार शरद पवारांचे पाय चाटत, आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. त्यात त्यांनी वारकरी संप्रदायातील २० तपस्वी व्यक्तींची यादी जाहीर करून त्यांना ‘घुसखोर’ म्हटले आहे. तसेच टीका करत असताना भाषेची व शब्दांची मर्यादा ओलांडत स्वतःची पात्रता - लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धर्मचार्यांमध्ये उद्रेक होऊन त्याचा परिणाम शाईफेकमध्ये झालेला आहे. संग्रामबापू भंडारे यांच्या ‘अधमाशी अधम-भले तरी देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी’ या उक्तीनुसार केलेल्या शाईफेकीच्या कृतीमुळे त्यांच्यावर दुटप्पी राजकीय वर्तुळामधून चौफेर टीका होत असून, कठोर कारवाईची मागणीसुद्धा होत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु, संग्रामबापू यांच्यावर कारवाईचा शिमगा साजरा करण्याचा प्रयत्न करणारी दुटप्पी राजकीय मंडळी; नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक झाली होती आणि अनंत करमुसे यांना घरात डांबून मारहाण झाली होती, तसेच हिंगोली येथे कीर्तनात केवळ समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख केल्यामुळे कीर्तनकारास मारहाण करण्यात आली होती, तेव्हा कोणत्या बिळात लपली होती किंवा त्यावेळेस त्यांची दातखिळी बसली होती का? असा प्रश्न सामान्य माणसांत चर्चिला जात आहे. त्याची उत्तरेसुद्धा आता दिली गेली पाहिजेत.
 
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा देशात सहिष्णू आणि सर्वसमावेशक असून, सुधारणावादी सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणारा भक्तिमार्ग आहे. हिंदू धर्मातील असंख्य जाती आणि अनेक पंथ विचारदर्शनांना एकतेच्या सूत्रात बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाची महत्त्वाची भूमिकासुद्धा आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील इतरांना ‘घुसखोर’, ‘धर्मांध’ म्हणणे किंवा त्यांची यादी घोषित करणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी वारकरी संप्रदायातील इतरांना ‘घुसखोर’ किंवा ‘धर्मांध’ म्हणणार्‍या विकास लवांडेसारख्या प्रवृत्तीचा निषेध असून, संग्रामबापू भंडारे यांनी शाईफेक करून अशा प्रवृत्तींना एक सावध इशारा दिला आहे किंवा वेळीच सुधरा, असा सूचक संकेत दिला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
 
तुकोबा म्हणतात, 
होईल तैसें बळ| फजीत करावे ते खळ॥
तुका म्हणे त्यांचें| पाप नाहीं ताडणाचें॥
 
अशोक राणे 
(लेखक मुक्त पत्रकार तथा संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
९४२४६५८३८५