खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आता एसआयटीनंतर ईडी चौकशी, शिवानिका ट्रस्टच्या व्यवहारांबाबत होणार विचारणा

    13-May-2026
Total Views |
Rupali Chakanakar ED Inquiry
 
नाशिक : (Rupali Chakanakar ED Inquiry) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी गुरुवारी (१४ मे) होणार आहे. खरात प्रकरणी एसआयटी चौकशी झाल्यानंतर आता खरातच्या आर्थिक प्रकरणांत चाकणकर यांना चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावलं आहे. खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर, शिवानिका संस्थान ट्रस्ट याबाबत चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
 
खरात याच्या शिवानिका ट्रस्टवर चाकणकर या विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवानिका ट्रस्टची सध्या ईडीकडून चौकशी करण्यात येते आहे. ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर यांची नेमकी भूमिका, आर्थिक व्यवहारात चाकणकर यांनी कोणते निर्णय घेतले, याबाबत चौकशीत विचारणा होण्याची शक्यता आहे.
 
यापूर्वी रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांच्या नावे असलेल्या ४ खात्यांबाबत ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. ज्या १३४ बनावट खात्यांतून ७० कोटींचं मनी लाँड्रिंग केल्याचा संशय आहे, त्यात या चार खात्यांचा समावेश असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.(Rupali Chakanakar ED Inquiry)
 
खरातचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर
 
अशोक खरात यानं केलेले लैंगिक अत्याचार समोर आल्यानंतर, खरातचे आर्थिक व्यवहारही चर्चेत आले होते. खरातनं खरेदी केलेल्या जमिनी, विविध पतसंस्थांमध्ये त्याच्याशी संबंधित खाती, मंदिर आणि संस्थानाला मिळालेल्या देणग्या, खरातच्या परदेश वाऱ्या, आर्थिक व्यवहार याची चौकशी ईडीकडून करण्यात येते आहे. शिवानिका ट्रस्टच्या पैशांतून खासगी मालमत्ता जमा करण्यात आली का, खरातच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांच्या नावे जमिनी खरेदी करण्यात आल्या का, याची चौकशी तपास यंत्रणांकडून करण्यात येतेय़. ट्रस्टला देण्यात आलेल्या देणग्यांचा कुठे आणि कसा विनियोग करण्यात आला, याचाही तपास करण्यात येतोय.(Rupali Chakanakar ED Inquiry)
 
 
रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच खरात प्रकरणात कोणतंही गैरकृत्य केला नसल्याचा दावा केला आहे. अशोक खरात याच्याशी असलेले संबंध केवळ धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपुरते होते, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाचाही ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध नव्हता, असंही चाकणकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. खरातच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत कोणतीही कल्पना नसल्याचा दावाही त्यांनी यापूर्वी केलेला आहे.
 
एसआयटीकडून चाकणकरांची सहा तास चौकशी
 
विशेष तपास पथकानं रविवारी चाकणकर यांची सहा तास चौकशी केल्यानंतर आता ईडीनं चाकणकरांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. फल ज्योतिषी असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची लैंगिक अत्याचार आणि खंडणी प्रकरणात एसआयटी चौकशी करतेय. चाकणकर यांच्या चौकशीत खरातशी त्या कशा संपर्कात आल्या, त्याच्या ट्रस्टवर त्या विश्वस्त म्हणून का गेल्या, ट्रस्टमध्ये चाकणकर यांच्यावर असलेली जबाबदारी याबाबत चौकशीत विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे. खरातचा राजकीय आणि आर्थिक फायदा करुन देण्यात चाकणकर यांची भूमिका होती का, या दिशेनंही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.(Rupali Chakanakar ED Inquiry)