‘शिवगर्जना प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शिवशाहीच्या विचारांचा जागर करणार्या प्रणय शेलार (भार्गव) यांची गोष्ट...
महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची आणि शूरांची भूमी. शिवछत्रपतींनी स्वराज्याचा विचार ज्या मातीमध्ये पेरला, त्या मातीतून भारताच्या मुक्तीसाठी संघर्ष करणार्या महाराष्ट्रधर्माचा विचार प्रज्वलित झाला. शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून समाजाच्या उन्नतीसाठी, युवकांना बळ देण्यासाठी काम करणारी माणसे सातत्याने कार्यरत असतात. ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’च्या माध्यमातून युद्धकला शिबिरांचे आयोजन करणारे असेच एक तरुण, तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रणय शेलार.
प्रणय यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील, महाड तालुक्यातील पेडामकरवाडी (वाकी) येथे झाला. ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या संपन्न अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच शिवकालीन बारव, रामदास पठार, शिवथर घळ, वाळणकोंड यांसारख्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली. सातवीत असताना त्यांचे मामा अजित पेडामकर यांनी माळ्यावर असलेली पणजोबांची तलवार दाखवली. ऐतिहासिक मुल्हेरी मुठीची, वक्र पात्याची, मराठा पद्धतीची ही तलवार ब्रिटिशांनी पणजोबांना सैन्यदलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बक्षीस म्हणून दिलेली होती, ही गोष्ट जेव्हा त्यांना कळली; तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. लहानपणापासूनच त्यांना इतिहासाची आवड. शालेय शिक्षण घेत असताना, त्यांचे ओळखीचे गृहस्थ शंकर देशमुख (नाना) यांच्या भांड्यांच्या दुकानात ते मदतीला जात होते. त्यावेळी पहिल्यांदाच ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’चा एक पैसा पहिल्यांदा त्यांना मिळाला. यानंतर इतिहासाबद्दल, ऐतिहासिक वस्तूंबद्दल त्यांचे कुतूहल उत्तरोत्तर वाढत गेले. प्रकाश कदम यांच्या संग्रहातील नाणी बघितल्यानंतर, प्रणय यांच्या नाणीसंग्रहाचा श्रीगणेशा झाला. प्रकाश कदम, रवी निमसे आणि संदीप चव्हाण यांच्या साथीने इतिहास या विषयाची आवड निर्माण झाली. त्यांच्यासोबतच लाठीकाठीचे धडे गिरवायला सुरुवात झाली. पुढे गिरीश जाधव (ऐतिहासिक शस्त्रसंग्राहक) आणि प्रशांत ठोसर (ऐतिहासिक नाणीसंग्राहक) यांचा परिसस्पर्श झाला आणि खर्या अर्थाने श्री शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याची त्यांची गोडी निर्माण झाली.
सामान्य कुटुंबात जन्मल्यामुळे आर्थिक अडचणी भरपूर आल्या आणि त्यांना धीराने तोंड देताना आई-वडिलांकडे पाहत असल्यामुळे आठवीपासूनच स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २००८ साली नितीन देसाई दिग्दर्शित ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत मर्दानी खेळातील त्यांचे मित्र आणि गुरुवर्य विजय माने यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने चांगले पैसेसुद्धा मिळायला लागले. अर्थात, हीच गोष्ट जेव्हा घरतल्यांना आणि नातेवाईकांना सांगण्यात आली, तेव्हा त्यांनी त्यांची मस्करी केली. मात्र, पुढे जेव्हा मालिकेचा ‘रिपीट टेलिकास्ट’ सुरू झाला, तेव्हा सगळ्यांचाच विश्वास बसला आणि इथूनच सिनेसृष्टीतील कामाचा श्रीगणेशा झाला. पुढे ‘वीर शिवाजी’, ‘राणी पद्मिनी’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पेशवा बाजीराव’ यांसारख्या ऐतिहासिक मालिकांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली.
प्रणय पूर्वीपासून मर्दानी खेळ शिकत होते आणि शिकवतसुद्धा होते. खर्या अर्थाने २०१२ पासून ‘शिवगर्जना मर्दानी तालीम’ या नावाने कार्यक्रम त्यांनी सुरू केला. यातूनच २०१५ साली ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’ नावाची संस्था जन्माला आली. मराठ्यांच्या युद्धकलेचा आणि शौर्यपरंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली जगप्रसिद्ध महानाट्य ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी कलाकार म्हणून आपला सहभाग नोंदवला. ‘सईशा फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ आणि ‘लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘राजा शिवछत्रपती’ या संगीतमय नाटकांत त्यांनी शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘रायगड महोत्सव २०१६’मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांनी युद्धकलांचे प्रदर्शन केले. तसेच २०२४ मध्ये सांस्कृतिक कार्य विभागामार्फत परभणी, लातूर आणि धाराशिव येथे आयोजित ‘महासंस्कृती’ महोत्सवात त्यांनी ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रप्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले.
मुंबई विभागातील अनेक ठिकाणी भारतीय युद्धकला शिबिरांचे आयोजन करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये, तसेच समाजातील विविध स्तरावर ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करून युद्धकला आणि ऐतिहासिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. संस्थेतर्फे गडकोट अभ्यास मोहीम, शौर्यगाथा युद्धभूमींची, ठाणे हेरिटेज वॉक, ‘भारतीय युद्धकला’ ई-दिवाळी अंक यांसारखे कार्यक्रम आयोजित करून आजच्या तरुण पिढीला आपल्या वारशाबद्दल माहिती देताना तो जतन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सुरू आहे. मुंबई विभागात युद्धकला प्रशिक्षण केंद्र सुरू करून आपल्या तरुण पिढीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ करण्याचे कार्य संस्थेकडून सातत्याने अविरतपणे सुरू आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून यावर्षी दादर येथे लहान मुलांसाठी ‘शौर्यांकुर’ हे साहसी शिबीर आयोजित केले होते. त्यात १०० पेक्षा जास्त मुलांनी सहभागी होऊन प्रतिसाद दिला.
‘कोविड’ काळात ‘हरी ॐ’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी प्रणय यांना मिळाली. त्यांच्या कार्यातील मैलाचा दगड म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा. कारण, याच सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला व त्यांच्या अभिनयातून साकारलेला ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामध्येसुद्धा मराठ्यांच्या युद्धकलेसाठी प्रणय यांना योगदान देता आले. त्यांच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले. कौशल्य आणि कष्ट या दोन गोष्टी एकत्र आल्यावर मनापासून केलेल्या कामाचे चीज होते, हेच आपल्याला प्रणय यांच्या कामातून दिसून येते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
९९६७८२६९८३