शतकानुशतके गावोगावी फिरत नंदीवाला समाजाने भगवान शिवशंकराच्या नंदीला सोबत घेऊन हिंदू समाजाची श्रद्धा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक नाळ जिवंत ठेवली. मुघल आणि इतर परकीय आक्रमणांच्या काळातही गावोगावी फिरून या समाजाने लोकांच्या श्रद्धेशी संवाद कायम ठेवला. घराघरांपर्यंत नंदी पोहोचवत आशीर्वाद, लोकविश्वास आणि परंपरा जपणारा हाच समाज आज महानगरी मुंबईत निवारा, ओळख आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यांच्या अडचणी, वेदना आणि अपेक्षा प्रभादेवी परिसरात त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून जाणून घेतल्या.
प्रभादेवी परिसरातील एका उड्डाणपुलाखाली नंदीवाला समाजातील काही कुटुंबांनी ताडपत्रीखाली तात्पुरता संसार मांडला होता. एका बाजूला बांधलेले नंदी, चुलीवर शिजणारा साधा स्वयंपाक, तर दुसर्या बाजूला कपड्यांच्या पिशव्यांमध्ये जपून ठेवलेली काही कागदपत्रे समोर उभं राहिलेलं हे दृश्य एका भटक्या-विमुक्त समाजाच्या असुरक्षित वास्तवाची साक्ष देत होतं.
"आम्हाला फार काही नको साहेब, फक्त राहायला जागा आणि मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे,” अशी साधी, पण वेदनादायी अपेक्षा या समाजाने व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मूळ गाव असलेले रामदास पवार सांगतात, "आमचे वडील, आजोबा सगळे हेच काम करत होते. नंदी घेऊन लोकांच्या दारात जायचं, आशीर्वाद द्यायचे आणि जे मिळेल, त्यावर संसार चालवायचा. पण, आता मुंबईत राहणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.”
अशा या नंदीवाला समाजासाठी नंदी हा फक्त प्राणी नाही, तो श्रद्धेचा भाग आहे, परंपरेचा आधार आहे आणि उदरनिर्वाहाचं साधनही आहे. अनेक कुटुंबे आजही नंदीसमोर भविष्य, मुलांचं शिक्षण, व्यवसाय किंवा घरातील प्रश्न विचारतात. मात्र, बदलत्या शहरात आणि बदलत्या मानसिकतेत ही परंपरा आता उपेक्षित होत चालल्याची खंत समाज व्यक्त करतो.
आमचं घर नाही, म्हणून ओळखही नाही.
प्रभादेवी परिसरात वास्तव्यास असलेल्या या समाजातील एका तरुणाने सांगितले, ”आज इथे, उद्या दुसरीकडे. त्यामुळे आधारकार्ड, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र टिकवणंही कठीण होतं.” भटकंतीमुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचेही समोर आले. शाळेत प्रवेशासाठी कागदपत्रांची मागणी होते; पण स्थिर पत्ता नसल्याने अनेक मुलं शिक्षणापासून दूर राहतात.
”आमचं आयुष्य गेलं, पण मुलांनी तरी शिकावं, असं वाटतं. आम्हाला नको ही भटकंती पुढच्या पिढीने करायला,”असे एका पालकाने सांगितले.
इथे राहू नका!
- प्रभादेवी परिसरातील वास्तव्यात सर्वांत मोठी समस्या म्हणजे, असुरक्षितता व भीती असल्याचे समाजाने सांगितले. अनेकदा स्थानिकांकडून जागा सोडण्यास सांगितले जाते.
- "इथे राहू नका, तुमच्या बापाची जागा नाही,” अशा शब्दांत हाकललं जातं, अशी तक्रार त्यांनी केली. काहींनी परिसरातील मद्यपी आणि असामाजिक घटकांकडून धमक्या मिळत असल्याचेही सांगितले.
- पावसाळ्यात ताडपत्रीखाली राहणे, स्वच्छ पाण्याचा अभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि लहान मुलांची गैरसोय यांमुळे त्यांचे जीवन अधिक कठीण बनते.
पोलीस कारवाई आणि दंडाची भीती
समाजाने सर्वाधिक गंभीर तक्रार केली, ती पोलीस आणि प्रशासनाकडून होणार्या कारवाईबाबत. नंदी घेऊन फिरताना संशयाने पाहिले जाते, काही वेळा नंदी ताब्यात घेतला जातो आणि त्याला सोडवण्यासाठी मोठा दंड भरावा लागतो.
१५ ते २० हजार रुपये दंड भरून नंदी सोडवावा लागतो. काही वेळा गुन्हेही दाखल होतात, अशी माहिती समाजातील प्रतिनिधींनी दिली.
त्यांच्या मते, पोलीस कायदे आणि महानगरपालिकेच्या कारवाईमुळे त्यांचा पारंपरिक व्यवसाय अधिकच कठीण झाला आहे. मात्र, नंदीवर अत्याचार होत असल्याचा आरोप ते फेटाळतात.
"नंदी आमच्या कुटुंबातलाच सदस्य असतो. आम्ही त्याला लहानपणापासून वाढवतो,” असे समाजातील तरुणाने सांगितले.
प्रश्न परंपरेचा नाही, अस्तित्वाचा आहे
येथे संवाद साधताना स्थानिक नागरिकांनी सांगितले, हे लोक कायमस्वरूपी अतिक्रमण करत नाहीत. त्यांच्याकडे माणुसकीने पाहण्याची गरज आहे. दंड आकारुन प्रश्न सुटणार नाही.
मुंबईच्या रस्त्यांवर आजही नंदीच्या घंटा ऐकू येतात. अनेकांसाठी तो केवळ पारंपरिक देखावा असतो; पण त्या घंटांमध्ये एका भटक्या समाजाची वेदना आणि सन्मानाने जगण्याची हाक दडलेली आहे.
नंदीवाला समाजाचा प्रश्न केवळ उदरनिर्वाहाचा नाही, तर ओळख, निवारा आणि अस्तित्वाचा आहे. शासन, मुंबई महानगरपालिका आणि समाजाने या वास्तवाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याची भावना या संवादातून प्रकर्षाने समोर आली.
पुढच्या पिढीबद्दलची चिंता
संवादादरम्यान एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, ती म्हणजे या समाजाला आपल्या मुलांनी हेच आयुष्य जगू नये, असं वाटतं.
मुलांनी शिकावं, नोकरी करावी. आम्ही जे भोगलं, ते त्यांनी भोगू नये, असे अनेक पालकांनी सांगितले. मात्र, शिक्षण, कागदपत्रे आणि निवार्याचा अभाव असल्याने बदलाचा मार्ग त्यांच्यासाठी अजूनही दूर आहे.
नंदीवाला समाजाच्या शासनाकडून मूलभूत अपेक्षा
- मुंबईत स्वतःच्या आणि नंदीसोबत राहण्यासाठी सुरक्षित जागा
- शासकीय ओळखपत्र आणि कागदपत्रांसाठी विशेष मोहीम
- मुलांच्या शिक्षणासाठी मदत
- दंडात्मक कारवाईत मानवी दृष्टिकोन
- भटक्या-विमुक्त प्रवर्गात ‘नंदीवाला समाज’ म्हणून विशेष सर्वेक्षण आणि नोंद समाजातील प्रतिनिधींनी सांगितले की, अनेकदा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा करूनही ठोस मदत मिळालेली नाही. परंतु, आता या समाजासाठी सकारात्मक कृतिशील निर्णयाची अपेक्षा आहे.
नंदीवाला समाजाच्या परंपरा आणि निवार्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे
तिरमळ नंदीबैलवाला समाजासाठी नंदी हा केवळ उपजीविकेचा आधार नसून शंकर-पार्वतीचे पवित्र वाहन आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या समाजाने देव, देश आणि धर्माशी जोडलेली परंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये नंदीवाला समाजाला निवारा, मूलभूत सुविधा, तसेच नंदीबैलांच्या संगोपनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गोवंश संरक्षणासाठी राज्य शासन प्रयत्नशील असताना या समाजावर अन्याय होऊ नये. प्रशासनाने त्यांच्या निवारा व अन्य प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
- उद्धवराव काळे
भटके-विमुक्त विकास परिषद,महाराष्ट्र
नंदीपरंपरा ही श्रद्धा आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक
नंदी हे भगवान महादेवाचे वाहन असून त्याचे दर्शन पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. पहाटे घराघरांत नंदी नेण्याची परंपरा ही हिंदू संस्कृतीचा अनादि काळापासूनचा भाग आहे. नंदीवाले समाज केवळ परंपरा जपत नाही, तर नंदी देवाचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन हे धर्मकर्तव्य म्हणून पार पाडत आहे. या श्रद्धास्थानाला विरोध करणे, म्हणजे समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळण्यासारखे आहे. शासनाने नंदीवाले समाजाला आर्थिक व सामाजिक साहाय्य देऊन या परंपरेचे जतन करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
-डॉ. संजय पुरी
कार्याध्यक्ष, भटके-विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र
९९६७०२०३६४