पावसाचा तडाखा, सांगलीत मंदिराशेजारील भिंत कोसळली ६ मृत्यू; १३ जण जखमी, नेमकं काय घडलं होतं?
13-May-2026
Total Views |
सांगली : (Motewadi Temple Tragedy) जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावात एका मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू तर, १३ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोटवाडी गावातील मरगुबाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात मंगळवारी यात्रेचा दिवस असल्याने जत परिसरातील तसेच कर्नाटक सीमाभागातील अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास या परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे या परिसरात उपस्थित भाविक आसरा घेण्यासाठी एका भिंतीखाली आणि पत्र्याच्या शेडखाली जमले.
परंतू, पावसाच्या तडाख्यामुळे ती भिंत आणि पत्र्याचे शेड कोसळले आणि तिथे उपस्थित लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १३ ते १४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सांगली जिल्ह्यातील मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थान मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांपैकी तिघे हे जत तालुक्यातील असून तिघे हे कर्नाटकातील आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत १३ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” (Motewadi Temple Tragedy)
“महाराष्ट्रातील सांगली येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल ऐकून अत्यंत दुःख झाले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना:”