मुंबई पोर्ट ट्रस्टकडून झोपडपट्ट्यांवरील तोडक कारवाई थांबवावी;मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

    13-May-2026   
Total Views |
Mangal Prabhat Lodha 
 
 
मुंबई : (Mangal Prabhat Lodha) मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येणाऱ्या रे रोड, न्यू बंदर रोड या भागातील झोपड्यांवरील सुरू असलेली तोडक कारवाई थांबवण्यात यावी, यासंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा मंगळवारी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
 
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, "मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने न्यायालयाचे निर्देश असल्याचे सांगून लोकांना धमकावले. त्यानंतर मी त्यांना न्यायालयाचे निर्देश दाखवण्यास सांगितले. पण आम्ही आमचे स्वत:चे न्यायालय बनवले असून त्याचा हा आदेश असल्याचे त्यांनी मला सांगितले. आजपर्यंत मी कधीही असे बघितले नाही. तिथल्या लोकांकडे १९९१ पासूनचे तिथे राहत असल्याचे जुने पुरावे आहेत. महाराष्ट्र सरकारचे आपले गृहनिर्माण धोरण आहे. ज्यांच्याकडे जुने पुरावे आहेत त्यांचे पुनर्वसन कुठे करता, असे त्यात सांगितले आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "मी काल पत्र लिहून त्यांची वेळ मागितली होती. परंतू, त्यांनी वाट न पाहता तिथले घरे तोडली. आता लोकांकडे असलेले जुने पुरावे बघून निर्णय करावा, असे मी त्यांना सांगितले आहे. त्यासाठी त्यांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. तीन दिवसांत काही केले नाही तर, पुढे काय करायचे याबाबत आम्ही निर्णय घेऊ. या सर्व घटनेचा आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. त्यांनी चुकीच्या पद्धतीने न्यायालयाचे नाव घेत लोकांना धमकावले आहे. आता मी मुंबई पोर्टच्या अध्यक्षांशी याबाबत बोलणार आहे. पावसाळ्याच्या काळात हे लोक कुठे जाणार, असा प्रश्न आहे." (Mangal Prabhat Lodha)
 
हेही वाचा :  पंढरपूर आणि साताऱ्यात माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारणार;राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मान्यता
 
पंतप्रधान मोदींच्या निर्देशांचे काटेकोर पालन करणार
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर बोलताना ते म्हणाले की, "सर्वांनी आपल्या गाड्यांचे ताफे कमी केले पाहिजे. मीसुद्धा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ पंतप्रधान नसून देशभक्त नागरिक आहेत. प्रत्येक देशात इराण-अमेरिका युद्धानंतर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना तेलाचा उपयोग मर्यादित करा, असे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशांचे आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते काटेकोर पालन करणार आहोत."
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....