...हीच ममतादीदींची कमाई!

    13-May-2026   
Total Views |
Mamata Banerjee Bengal Defeat
 
ममतादीदींना १५ वर्षे एकहाती सत्ता दिल्यानंतरही विकासापासून वंचित राहिलेल्या बंगालच्या जनतेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला अक्षरश: राज्यातून उखडून फेकले. एकीकडे बंगालमध्ये विजयी जल्लोष असताना, शेजारी बांगलादेशात मात्र दीदींचा पराभव धर्मांधांच्या चांगलाच जिव्हारी लागला. इतका की, ममतादीदींच्या समर्थनार्थ चक्क ढाक्यामध्ये मोर्चा काढण्यात आला. म्हणजे, एखाद्या देशाने अन्य देशातील सीमावर्ती भागातील मुख्यमंत्री पराभूत झाली, म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे दीदींनी गेल्या १५ वर्षांत काय कमावले असेल, तर बांगलादेशातील धर्मांधांचे असे हे अगाध प्रेम...
 
बांगलादेशातील धर्मांधांना ममतादीदींची इतकी आपुलकी की, केंद्रातील मोदी सरकारविरोधात लढण्याचा सल्लाही या हितचिंतकांनी दीदींना दिला. एवढेच नाही, तर मोदी आणि सुवेंदू अधिकारी यांना बंगालमधील मुस्लिमांविरोधात कारवाई केल्यास वाईट परिणाम होतील, म्हणून फुटकळ धमकीही दिली. पण, मुळात या धर्मांधांना दीदींच्या पराभवाचा इतका राग का यावा? कारण, दीदींच्या राज्यात बांगलादेशी घुसखोरांसाठी बंगाल म्हणजे ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती होती. पण, आता भाजपचे सरकार सत्तेत आल्यामुळे या बेकायदेशीर भाईचार्‍यालाही कायमस्वरूपी सुरुंग लागेल. सीमावर्ती भागातील इस्लामीकरण, ड्रग्ज-तस्करी यांचे जाळेही उद्ध्वस्त होईल. म्हणूनच हा थयथयाट! म्हणजे बघा, धर्माने हिंदू असलेल्या दीदी पराभूत झाल्या, तरी बंगालमधील मुस्लीम रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसले नाही. पण, दीदींच्या पराभवाने बांगलादेशी मुस्लिमांच्या पोटात धस्स झाले, हाच ममताबानोंचा करिष्मा!
 
मुस्लिमांच्या गळ्यातले ताईत ठरलेल्या दीदींनी बांगलादेशसोबतच्या तिस्ता नदी जलवाटप कराराला वर्षानुवर्षे विरोध दर्शविला. उत्तर बंगालमधील शेतकरी संकटात येतील, म्हणून दीदींनी हा करार होऊ दिला नाही. त्यामुळे बांगलादेशात दीदींविरोधात मोर्चे निघाले, आंदोलनेही झाली. बांगलादेशातील सत्ताधारी ‘बीएनपी’ पक्षानेही दीदींच्या आडमुठेपणावर वेळोवेळी टीका केली. पण, आज ‘ममतादीदी परत या’ म्हणून हेच बांगलादेशी रस्त्यावर उतरले आहेत. म्हणजेच काय, तर बांगलादेशच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या दीदींचा तरीही इतका पुळका, का तर त्यांच्या मुस्लीमधार्जिणेपणामुळेच!
 
...म्हणून भाजपला बधाई!
 
'आयाराम-गयाराम संस्कृती' ही भारतीय राजकारणात अजिबात नवीन नाही. परंतु, मागील काही वर्षांत काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांना लागलेली घरघर पाहता, कित्येक नेते, कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपची वाट धरली. कारण, या पक्षांना भविष्य नाही. त्यामुळे आपले राजकीय करिअरही अंधकारमय होईल, या भीतीने भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढले. तसेच काही नेतेमंडळींनी भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून संरक्षणासाठीही भाजपकडे मोर्चा वळवल्याची टीकाही झाली. नेमकी हीच बाब लक्षात घेता, प. बंगालमध्ये बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने पराभूत तृणमूल काँग्रेसमधील कार्यकर्ते-नेतेमंडळींना सध्यातरी पक्षप्रवेशासाठी लाल झेंडा दाखवला आहे.
 
‘सत्ता आवडे सर्वांना’ ही उक्ती सर्व पक्षांना-नेतेमंडळींना अगदी समसमान लागू होते. सत्तेत असलो किंवा सत्ताकेंद्राच्या जवळ असलो, तरी आपली कामे मार्गी लागतील, लोकांमध्ये थोडे वजन राहील, अशी यामागची एक धारणा. तृणमूल काँग्रेसच्या दारुण पराभवानंतरही बंगालमध्ये कित्येक नेते, कार्यकर्ते हे भाजपप्रवेशासाठी इच्छुक आहेत. परंतु, बंगालच्या प्रदेश नेतृत्वाने तृणमूलच्या कोणत्याही सदस्याला भाजपमध्ये प्रवेश द्यायचा नाही, हे ठरवून एक चांगला पायंडाच पाडला. त्याचे कारण म्हणजे, तृणमूलमधील कित्येक नेते-कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचाराचे, गैरप्रकारांचे आरोप आहेत. तेव्हा केवळ आपल्यावरील चौकशीचे शुक्लकाष्ठ टाळण्यासाठी ही मंडळी भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक आहेत. तसेच तृणमूल काँग्रेसकडूनही मुद्दाम काहींना भाजपमध्ये भरती करून घेऊन, आतल्या गोटातली माहिती मिळवण्याचे प्रयत्नही होऊ शकतात. हे प्रकार टाळण्यासाठीच प्रदेश भाजपने तृणमूलच्या कार्यकर्त्यांना ‘नो एन्ट्री’ अशी भूमिका घेतली, जिचे स्वागतच केले पाहिजे. ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस यांना महापालिकेत नोकरीसाठी उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने अटक केली आहेच. शिवाय, ममतांचा पुतण्या आणि तृणमूलची सूत्रे हातात असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्याभोवतीही भविष्यात भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीचा फास आवळला जाऊ शकतो. त्यामुळे तृणमूलच्या भ्रष्टाचारी नेते-कार्यकर्त्यांना दूर ठेवण्याचा भाजपचा निर्णय स्वागतार्ह असाच!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची