मनमानी भाडेवाढ करणे पडणार महागात; खासगी वाहतूक कंपन्यांवर कारवाई होणार;खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करण्याचे;परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयांचे निर्देश

Total Views |
Maharashtra Transport Action
 
मुंबई : (Maharashtra Transport Action) राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
 
या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे, सुनील हनवट आदी उपस्थित होते.(Maharashtra Transport Action)
 
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गठित समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येईल. समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
हेही वाचा :  मुंबई पोर्ट ट्रस्टकडून झोपडपट्ट्यांवरील तोडक कारवाई थांबवावी;मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
 
सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांचे बुकिंग करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने सण-उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जातात. प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या अशा प्रवासी बस वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
 
1 जूनपासून एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहे मोफत
 
राज्यातील एसटी बस आणि बसस्थानकांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद करून मंत्री सरनाईक म्हणाले की, बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. १ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार असून, प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(Maharashtra Transport Action)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.