कोकणच्या सुपुत्राची ऐतिहासिक भरारी.सनई वादनाचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम
13-May-2026
Total Views |
मुंबई : (India Book of Records) कोकणच्या मातीतील पारंपारिक लोककलेचा वारसा जपत एका जिद्दी कलाकाराने राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध सनई वादक संदेश हरिश्चंद्र मुरुडकर यांनी सलग सनई वादनाचा अद्वितीय विक्रम प्रस्थापित करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची सुवर्ण अक्षरांनी नोंद केली आहे. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संदेश मुरुडकर आणि त्यांचे धाकटे बंधू आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिट्टी वादक आणि या पथकाचे प्रमुख ढोल वादक रुपेश मुरुडकर यांनी गेली तब्बल २५ वर्षे कोकणातील पारंपारिक ‘खालू बाजा’ अर्थात कोळी आणि आगरी समाजाच्या टिमकी बाजा या लोककलेचे अत्यंत जिद्दीने, निष्ठेने आणि समर्पण भावनेने संवर्धन केले आहे. संदेश मुरुडकर हे ‘त्रिमुर्ती संदेश खालू बाजा आणि नृत्य पथक रजि.’ या संस्थेचे अध्यक्ष असून ते प्रमुख सनई वादक म्हणून कार्यरत आहेत.
मुंबईसारख्या धकाधकीच्या महानगरात राहूनही त्यांनी आपल्या मातीतल्या लोककलेची ओळख जपली असून आपल्या सनईच्या सुरांनी महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.संदेश मुरुडकर यांच्या विक्रमी नोंदीचे तसेच पथकाच्या २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे औचित्य साधून मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथील पाठक टेक्निकल कॉलेज हॉलमध्ये भव्य-दिव्य रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा खालू बाजा क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण ठरला.
या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील, माजी कुलगुरू डॉ. अर्जुनराव मुरुडकर, बिग बॉस फेम गायक संतोष चौधरी (दादूस) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. खासदार विनायक राऊत यांनी कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन करत लोककला जपणाऱ्या कलाकारांना शासनाने अधिक बळ देण्याची गरज व्यक्त केली. तसेच कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनीही पथकाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. (India Book of Records)
उपस्थित मान्यवरांनी मुरुडकर बंधूंच्या अथक परिश्रमांचे, त्यांच्या कलेवरील निष्ठेचे आणि लोकपरंपरा जपण्याच्या ध्यासाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी कोळी-आगरी समाजाचा पारंपारिक टिमकी बाजा आजही जिवंत ठेवणाऱ्या मुरुडकर बंधूंसह त्यांच्या परिवाराचे आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले. सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने या कार्यक्रमाचे कव्हरेज करुन या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली. (India Book of Records)
विशेष म्हणजे, खालू बाजा क्षेत्रातील आणि कोकणातील हे एकमेव शासकीय नोंदणीकृत पथक असून त्यांच्या कार्याची शासकीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. तसेच या पथकाने आकाशवाणी मुंबई केंद्रात अधिकृत ऑडिशन देत मान्यता प्राप्त केली आहे. मुंबईसारख्या महानगरात राहूनही या कलाकारांनी आपल्या लोककलेला केवळ जिवंत ठेवले नाही, तर तिला सन्मान आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले आहे.
कोकणच्या पारंपारिक खालू बाजा लोककलेतील सनईला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणारे संदेश मुरुडकर हे आज कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रेरणादायी प्रतीक ठरत आहेत. (India Book of Records)